मुंबई दि. 20 :-  राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना येत्या गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सणानिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वितरीत करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. हा आनंदाचा शिधा गुढीपाडवा या मराठी नवीन वर्षांपासून पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी वितरीत करण्यात येणार आहे.

राज्यातील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा अशा शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील दारिद्रय रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे. आनंदाचा शिधा वाटप कार्यक्रम सर्व जिल्ह्यांत एकाच वेळी सर्व ठिकाणी आयोजित करण्याच्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाला दिल्या आहेत.

राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्रय रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी एक किलो या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व एक लिटर या परिमाणात पामतेल हे शिधाजिन्नस देण्यात येणार आहे. हा ‘आनंदाचा शिधा’ गुढीपाडवा या मराठी नवीन वर्षापासून पुढील एक महिन्याच्या कालावधीकरिता ई-पॉस प्रणालीद्वारे 100 रुपये प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

शिधाजिन्नस खरेदी करण्याकरिता 455.94 कोटी रुपये व इतर अनुषंगिक खर्च 17.64 कोटी रुपये अशा एकूण 473.58 कोटी रुपये इतक्या अंदाजित खर्चास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय यापूर्वीच अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून जारी करण्यात आला आहे.

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!