पुणे दि. २८: तंबाखूचे दुष्परिणाम आणि वाढते कॅन्सरचे प्रमाण रोखण्यासाठी प्रभावी जनजागृती व लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी हिंमत खराडे यांनी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या सभेमध्ये केले.
तंबाखू विरोधी जनजागृती अभियानाचा शुभारंभ खराडे यांच्या हस्ते कोटपा 2003 कायद्याच्या फलकाचे अनावरण करुन करण्यात आला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या नोडल अधिकारी डॉ. सारीका खाडे, मानसशास्त्रज्ञ हनुमान हाडे, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे विभागीय अधिकारी रंगनाथ जोशी, दंत शल्यचिकित्सक डॉ. विद्या कांबळे, सामाजिक कार्यकर्त्या मोहिनी भोसले आदी उपस्थित होते.
तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम आणि त्याचा भावी पिढीवर होणारा दुष्परीणाम याविषयी जनजागृती करण्यात येणार असल्याचे सांगून खराडे म्हणाले, लोकांना तंबाखूच्या सेवनापासून परावृत्त करण्याचा हा एक स्तुत्य प्रयत्न आहे. सर्व शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्थांच्या परिसरामध्ये शासन धोरणानुसार तंबाखू सेवनावरील व विक्री विषयीच्या नियमांचे काटेकोर पालन होणे गरजेचे आहे. तसेच शासकीय कार्यालयांमध्ये तंबाखूचे सेवन केले जाणार नाही याविषयी प्रबोधनही या आभियानाच्या माध्यमातून केले जाणार आहे. या अभियानास सर्व शासकीय कार्यालये तसेच शैक्षणिक संस्थांनी सक्रीय सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्यात जास्तीत जास्त शाळा तंबाखूमुक्त शाळा म्हणून घोषित होण्याच्यादृष्टीने या कार्यक्रमात शाळांचा सक्रीय सहभाग वाढवावा. जिल्ह्यात या कायद्याविषयी जनजागृती करण्यासाठी मास्टर ट्रेनर तयार करावेत, तालुका स्तरीय समित्या कार्यान्वित कराव्यात असेही खराडे म्हणाले.
पुणे जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचा तंबाखू नियंत्रण कक्ष व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था संभाजी नगर यांच्या वतीने पुणे शहरात तीन दिवस तंबाखूविषयक जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
Comments are closed