पुणे दि.३१: महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे व पुणे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ योजनेंतर्गत ‘आंबा महोत्सव २०२३’ चे गुलटेकडी मार्केटयार्ड येथे पीएमटी बस डेपो शेजारील जिल्हा परिषदेच्या मोकळ्या जागेत १ एप्रिलपासून आयोजन करण्यात येणार आहे.

कृषि पणन मंडळामार्फत दरवर्षी ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’अंतर्गत गुलटेकडी मार्केटयार्ड येथे आंबा महोत्सवाचे आयोजन २००२ पासून करण्यात येत आहे. विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थांची संख्या कमी करून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा आंबा मिळावा या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.

यावर्षी महोत्सवामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यातील तसेच राज्यातील केशर आंबा उत्पादकांबरोबरच जिल्हा परिषदेकडील ग्रामिण विकास यंत्रणा विभागाकडील काही महिला बचत गटांचाही सामावेश असणार आहे. आंबा उत्पादकांची नोंदणी प्रक्रिया पणन मंडळाच्या विभागीय कार्यालयाकडे करण्यात येते. छाननीनंतर उत्पादकांना महोत्सवात स्टॉल उपलब्ध करून देण्यात येतात.

यावर्षी सुमारे १०५ उत्पादकांनी विभागीय कार्यालयाकडे नोंदणी केलेली आहे. या उत्पादकांमार्फत उत्तम प्रतिचा आंबा ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. हा महोत्सव ग्राहकांच्या सोईसाठी आयोजित करण्यात येत असून सुमारे ७० स्टॉल उत्पादकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना हापूस, केशर, पायरी आंबा तसेच बचत गटांची विविध प्रक्रियायुक्त उत्पादने खरेदीची संधी असेल.

आंबा महोत्सव १ एप्रिलपासून सुरू होणार असून साधारणपणे ३१ मेपर्यंत चालणार आहे. तरी कोकणातील उच्च प्रतीच्या हापूस आंब्याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक दिपक शिंदे यांनी केले आहे.


 

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!