प्रा. दिपक धर यांना ‘पद्म भूषण’ तर अन्य चौघे ‘पद्म श्री’ ने सन्मानित
नवी दिल्ली, 6 :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सर्वोच्च नागरी ‘पद्म पुरस्कारा’ने 55 मान्यवरांना सन्मानित केले. यामध्ये महाराष्ट्राच्या 5 मान्यवरांचा समावेश आहे. प्रा. दिपक धर यांना ‘पद्म भूषण’ पुरस्काराने तर अन्य चार मान्यवरांना ‘पद्म श्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये पद्म पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला. राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमास उपराष्ट्रपती जगदीप धनखड़, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, केंद्रीय गृह मंत्री अमित शहा, यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्रीगण कार्यक्रमास उपस्थित होते.
आज पार पडलेल्या पद्म पुरस्कार वितरण सोहळयात एकूण 55 मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून यामध्ये राज्यातील 5 मान्यवरांचा समावेश आहे. प्रा. दिपक धर यांना ‘पद्म भूषण’ तर गजानन माने, परशुराम खुणे, रवीना टंडन आणि कुमी वाडिया यांना ‘पद्म श्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी प्रा.दिपक धर यांना आज पद्म भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रा. धर सांख्यिकीय भौतिकशास्त्रावरील संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेले प्रख्यात सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आहेत. प्रा. धर यांना विज्ञानातील अत्यंत प्रतिष्ठेचा जागतिक स्तरावरील बोल्ट्झमन पुरस्कार (Boltzmann Medal) सांख्यिकीय घोषित झाला आहे.
राज्यातील 4 मान्यवरांना ‘पद्म श्री’ पुरस्कार प्रदान
गजानन माने यांना त्यांच्या सामाजिक क्षेत्राच्या कार्यासाठी आज ‘पद्म श्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले. श्री माने यांनी कुष्ट रोग्यांसाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांच्या याच कार्याचा आज सन्मान झाला.
परशुराम खुणे यांना लोककला क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी आज पद्म श्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री खुणे यांनी नक्क्षल प्रभावित भागात लोककलेच्या माध्यमातून पुर्नवास आणि सामजिक कुप्रथांवर बोट ठेवून लोक जागृती केली. त्यांच्या या कार्याची दखल घेत आज त्यांना पद्म श्री पुरस्काराने गौरविण्यात आले.
कला क्षेत्रातील योगदानासाठी सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री रवीना टंडन यांना आज पद्म श्री पुरस्काराने गौरिवण्यात आले. श्रीमती टंडन या 25 वर्षांपासून चित्रपट सृष्टीत काम करीत असून अनेक सिनेमामंधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
कला क्षेत्रातील योगदानासाठी कुमी वाडीया यांना आज पद्म श्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोरल संगीत ‘कंडक्ट’( संचलन) करणाऱ्या त्या प्रथम भारतीय महिला आहेत. त्यांनी आजवर देश विदेशात अनेक कार्यक्रम सादर केलेले आहेत. त्यांच्या याच कामगिरी साठी आज त्यांचा सन्मान झाला आहे.
एकूण 55 पद्म पुरस्कारांचे वितरण आज करण्यात आले. 3 मान्यवरांचा पद्म विभूषण, 5 मान्यवरांचा पद्म भूषण आणि 47 मान्यवरांचा पद्म श्री पुरस्काराने गौरव झाला.
Comments are closed