पुणे,दि.२५ ( punetoday9news):- गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेऊन गुन्हेगारी रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या सूचना दिल्या. शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीस पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, रामनाथ पोकळे,पोलीस उपायुक्त बच्चन सिंग, मितेश घट्टे, जिल्हा पोलीस अधीक्षक संदिप पाटील व इतर अधिकारी उपस्थित होते.
गृहमंत्री देशमुख यांनी कोरोना आणि त्यानिमित्ताने निर्माण झालेली परिस्थिती जाणून घेतली.
पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांनी पुणे शहर पोलिसांनी हद्दपार आरोपींकरीता केलेल्या “ExTra” (Tracking of Externees) ॲपची माहिती दिली.
पुणे शहरामधून हद्दपार झालेल्या इसमास त्याने पुन्हा पुणे शहरात येवुन गुन्हेगारी कृत्य करू नये याकरीता “ExTra” (Tracking of Externees) ॲप
विकसित करण्यात आले आहे. त्याच्या अंमलबजावणीची सुरूवात करण्यात आली आहे. या ॲपमुळे हद्दपार गुन्हेगारास गुन्हेगारी कृत्य करण्यापासून परावृत्त करण्याचा मुख्य उद्देश साध्य होईल. हद्दपार आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे सोयीचे होईल. हद्दपार गुन्हेगारावर निगराणी , देखरेख करणे सोयीस्कर होईल. कमी मनुष्यबळामध्ये परिणामकारकरित्या गुन्हेगारावर निगराणी ठेवणे शक्य होईल. हद्दपार आदेशाचे उल्लघंन होवून दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण कमी होवून पोलीस तपास यंत्रणेवरील अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होईल. ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हेगार हद्दपार कालावधीमध्ये वास्तव्यास असेल त्या पोलीस स्टेशनमध्ये देखील नमुद गुन्हेगारावर प्रभावी निगराणी ठेवू शकतील, असे बच्चन सिंग यांनी सांगितले.
जिल्हा पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांनी “स्मार्ट पोलिसिंग” बाबत माहिती दिली. बैठकीस इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.

जाहिरात:-


Comments are closed

error: Content is protected !!