पुणे, दि.२६:-  उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवा संसदेच्या माध्यमातून बलशाली राष्ट्र निर्मितीसाठी आवश्यक असलेले ‘पंचप्रण’ युवा पिढीपर्यंत पोहोचवून सक्षम युवा पिढी घडविण्याचे कार्य होईल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

 




सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पै. खाशाबा जाधव क्रीडा संकुल येथे आयोजित राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी अधिवेशनात जी-२० कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक उपक्रम आणि पंचप्रण-युवा संसद कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, कुलगुरु डॉ. कारभारी काळे, भारत सरकारचे शालेय शिक्षण विभागाचे सचिव संजय कुमार, राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, राष्ट्रीय सेवा योजना राज्य सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे, योजनेचे राज्य जनसंपर्क अधिकारी डॉ. रामेश्वर कोठावळे आदी उपस्थित होते.




उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समर्थ राष्ट्र घडविण्यासाठी हे पंचप्रण सांगितले आहेत. जेव्हा युवापिढी हे पंचप्रण समजून घेईल त्यावेळी आपण समर्थ भारत तयार करू. देशसेवेचा हा भाव आपल्याला राष्ट्राचा प्राण बनण्याकरता जिथे प्रेरित करतो अशा क्षेत्रात एनएसएसचे विद्यार्थी काम करत आहेत. या देशाच्या भविष्याला आकार देणारे हे क्षेत्र आहे. येत्या काळात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून हे पंचप्रण युवकांपर्यंत पोहोचतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

फडणवीस म्हणाले, आज जगात सर्वात जास्त तरुणाई असलेला देश भारत आहे. आपले सरासरी वय २७ वर्षे आहे, सर्वाधिक विद्यार्थी असलेला देशही भारत आहे. आपण जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालो आहोत. इंग्लंडनंतर लवकरच आपण जपानला मागे टाकणार आहोत. विकासाचा नवा मार्ग दिसत असताना युवा पिढीची भूमिका सर्वात महत्वाची असणार आहे. विकास करताना भारताच्या शाश्वत मुल्यांचे रोपण करावे लागणार आहे. भारताला पुढे नेणाऱ्या पिढीची मानसिकता समजून त्यांच्याशी संवाद साधण्याचा हा उपक्रम आहे.

विकास, गौरवाची भावना, वारशाचा अभिमान आणि सेवाभावनेचा कर्तव्यपथ

पंचप्रणात पहिला प्रण विकसीत भारताची संकल्पना आहे. सामाजिक आर्थिक परिवर्तनातून शेवटच्या व्यक्तीचे कल्याण होणे आणि तो पहिल्या व्यक्तीच्या पंक्तीत येऊन बसणे ही खरी विकसीत भारताची कल्पना आहे. देशाप्रती गौरवाची भावना आवश्यक आहे, म्हणूनच दुसरा प्रण गुलामगिरीच्या सर्व खुणा मिटविणे आहे. त्याशिवाय आपले तेज आपण परत आणू शकणार नाही.

दहा हजार वर्षापासून नागरिकीकरणात सातत्य असलेला आपला देश आहे. म्हणून तिसरा प्रण म्हणून आपल्या वारशाचा अभिमान आपल्याला बाळगायचा आहे. आपल्या वैभवशाली इतिहासाचा आपल्याला अभिमान असायला हवा. त्यासोबतच समाजमनातील विकृती आपल्याला संपविता यायला हव्यात. देशातील एकात्मतेचे सामर्थ्य समजावून घेण्याची गरज आहे. त्यासाठी विविधतेत असलेले एकतेचे सामर्थ्य हा चौथा प्रण लक्षात ठेवायला हवा.

पाचवा प्रण नागरिकांचे कर्तव्य लक्षात ठेवण्याचा आहे. राष्ट्रीय सेवा योजनेत काम करतांना आपण विद्यार्थ्यांना त्यांच्या कर्तव्याची आठवण करून देत असतो. प्रत्येक व्यक्तीच्या यशात समाजाचा वाटा असतो हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे देशासाठी काही देणे लागतो ही भावना मनात निर्माण होणे गरजचे आहे. युवकांनी सेवाभावनेचा कर्तव्यपथ विस्तारीत करीत एकात्मतेतून संपन्न भारत घडवावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण सचिव संजय कुमार म्हणाले, जी-२० अंतर्गत एज्युकेशन वर्कींग ग्रुपला चार भागात विभागण्यात आले आहे. मद्रास येथे तंत्रज्ञान, अमृतसर येथे शिक्षण क्षेत्रातील संशोधन, भुवनेश्वर येथे तंत्रज्ञानातून घडणारे भविष्य आणि नंतर पुणे येथे फाऊंडेशन लिटरसीवर विचारमंथन होणार आहे. पुणे देशातील शिक्षणातील अग्रेसर केंद्र असल्याने वर्कींग ग्रुपच्या बैठकीच्या समारोपासाठी पुणे हे अत्यंत योग्य स्थळ असल्याचे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी जी-२० अंतर्गत शैक्षणिक उपक्रमांचा शुभारंभ उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. राजेश पांडे यांनी जी-२० वर आधारीत लिहिलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन उपमुख्यमंत्री महेादयांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला राज्यभरातून आलेले राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!