मान्सूनपूर्व पावसाने पिंपळे गुरवमधील पावासाळापूर्व कामांचा बोजवारा

पावसाळापूर्व कामांचा पुन्हा आढावा घेण्याची राजेंद्र जगताप यांची मागणी

पिंपरी, दि. ३० : सोमवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे महापालिका तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत झालेल्या कामांचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. नवी सांगवीतील एम. एस. काटे चौकात पाणी जायला जागाच नसल्याने गुडघाभर पाणी साठल्याने पादचारी, दुचाकीस्वारांची तारांबळ उडाली. त्यामुळे पावासाळापूर्व कामे आणि स्मार्ट सिटीच्या कामांच्या दर्जा काय ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी उपस्थित केला आहे.


पिंपळे गुरवमधील मोरया पार्क गल्ली क्रमांक 1 ते 6 कडे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. महापालिका प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सोमवारी झालेल्या पावासात मोरया पार्कमधील जवळपास सर्वच गल्ल्या चिखलमय झाल्या होत्या. तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे मुख्य रस्त्यांची कामे पूर्ण करताना अंतर्गत रस्त्यांकडे दुर्लक्ष झाले आहे, असा सवालही राजेंद्र जगताप यांनी केला आहे.

मोरया पार्कच्या सर्व गल्ल्यांना जोडणारा मुख्य रस्ता सततच्या दुरुस्त्यांमुळे नागरिकांमध्ये चर्चेचा बनला आहे. या परिसरातली ड्रेनेज लाईन सतत तुंबत होती. त्यामुळे वर्षभरापूर्वी रस्ते खोदाई करून ड्रेनेज लाईन टाकण्यात आली. मात्र, नवीन ड्रेनेज लाईनचे चेंबर रस्त्याच्या वरच राहिलेले आहेत. त्यामुळे पावसामुळे पाणी साठल्याने दुचाकी व चारचाकी वाहने घेऊन जाणे जिकिरीचे बनले आहे. दुचाकी घसरून सतत अपघात होत आहेत. दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागत आहे. मोरया पार्कच्या अंतर्गत रस्त्याची कामे जैसे थे अवस्थेत आहेत.

एम.एस. काटे चौक हा महत्त्वाचा चौक आहे. या चौकातील रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. पावसाळापूर्व कामेही पूर्ण केली आहेत. मात्र, तरीही सोमवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते. त्यामुळे नागरिकांना पायी चालणे देखील जिकिरीचे बनले होते.
————————————————

पिंपळे गुरव, नवी सांगवी परिसरात महापालिका व स्मार्ट सिटी प्रशासनाने मिळून अनेक कामे केली आहेत. मात्र, पावसामुळे कामांचा उदालेला बोजवारा पाहता पावासाळापूर्व कामे व रस्त्यांच्या कामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. महापालिका प्रशासनाने पावसाळापूर्व कामे आणि मोरया पार्कच्या अंतर्गत गल्ल्यांची कामे पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा.
-राजेंद्र जगताप, माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस

 

 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!