सोसायटी धारकांकडून विमाननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

पुणे, प्रतिनिधी :
सोसायटी आवारामध्ये धुडगूस घालून महिलांना त्रास देत असलेल्या ग्रोसरी डिलिव्हरी बॉयवर कारवाई करून सोसायटी आवारातील सदर कंपनीचे गोडावून बंद करण्याची मागणी सोसायटी धारकांनी केली आहे. या संदर्भात विमाननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
विमाननगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत सोसायटी धारकांनी म्हटले आहे, की ललवानी प्लाझा ए अँड बी को-ऑपरेटिव्ह सोसायटी ही नेहमीच शांत, भांडण तंटा नसलेली सोसायटी आहे. सोसायटीमध्ये काही खासगी कार्यालये आहेत. त्यातीलच एक कार्यालय ग्रोसरी विक्री करणाऱ्या झेप्तो कंपनीने कार्यालयासाठी भाड्याने घेतले आहे. सुरुवातीला कार्यालय म्हणून घेतलेल्या हे कार्यालय कंपनीने गोडावून म्हणून वापरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे या ठिकाणी 50 ते 60 मुले डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. हे डिलिव्हरी बॉय केवळ दहा मिनिटात मालाची डिलिव्हरी करून सोसायटी आवारात येऊन धिंगाणा घालतात. मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी लावतात. महिलांकडे पाहून हातवारे करून अश्लील कमेंट करतात. एवढेच नाही तर अन्य कार्यालयात येणाऱ्या महिलांचे व्हिडीओ शूटिंग करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. येण्या-जाण्याच्या रस्त्यावर दुचाकी अडव्या लावून अडथळा निर्माण करीत आहेत. तसेच कार्यालय सुटल्यानंतर काही मुले महिलांचा पाठलाग करीत आहेत. त्यांच्याकडे बघावे, म्हणून महिलांना हातवारे करून इशारेवजा आवाज करतात. त्यामुळे महिलांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
यातील काही मुले गुंड प्रवृत्तीची असल्यामुळे त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी महिला धजावत नाहीत. त्यामुळे आता पोलिसांनी या गुंड प्रवृत्तीच्या डिलिव्हरी बॉयवर कारवाई करून महिला कर्मचाऱ्यांची त्यांच्या त्रासातून सुटका करावी, अशी मागणी सोसायटी धारकांनी केली आहे.

 

 




 




 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!