पुणे दि. ३: ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे व स्वामी विवेकानंद संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे ५ जून रोजी सकाळी १० वाजता शहरात महात्मा फुले हायस्कूल, नाना पेठ येथे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात जिल्ह्यातील औद्यगिक परिसरातील एकुण २१ उद्योजकांनी सहभाग दर्शविला असून एकूण २ हजार ८३० रिक्तपदे भरण्याचे कळविले आहे. हा रोजगार मेळावा १० वी, १२ वी, पदवीधर, पदव्युत्तर, आयटीआय सर्व ट्रेड, डिप्लोमा, इंजिनिअर, बीबीए, बीसीए, एमसीए, एमबीए-फायनान्स, मार्केटिंग, बीएससी व एमएससी अशा विविध पात्रताधारक उमेदवारांसाठी असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत. दिव्यांग उमदेवारासाठीही नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.

इच्छुक उमेदवारांनी रिक्तपदांच्या अधिक माहितीसाठी http://www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन आपापले पसंतीक्रम नोंदवावेत. खाजगी क्षेत्रातील या विविध रिक्तपदांच्या प्रत्यक्ष मुलाखतीसाठी जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांनी रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवून संधीचा लाभ घ्यावा.

मुलाखतीस येताना उमेदवारांनी आपली मूळ शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्जाच्या व आधारकार्डाच्या प्रती सोबत आणाव्यात, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहायक आयुक्त सा. बा. मोहिते यांनी केले आहे.






 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!