पुणे :  पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालचा परिसर ,पृथ्वीवरील मानवी सजीव प्राण्यांचे जीवन हे स्वच्छ आणि संतुलित पर्यावरणावर अवलंबून आहे. पर्यावरणीय असंतुलनामुळे मागील काही दशकात मानवी जीवन व निसर्ग अस्थव्यस्थ झालेले आहेत. हीच समस्या ओळखून जगभर जनजागृती करण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्र संघाने 5 जून पर्यावरण दिन साजरा करण्याचे ठरविले. 5 जून 1974 रोजी पहिला पर्यावरण दिन साजरा करण्यात आला, याचा प्रमुख उद्देश की पर्यावरण संरक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने प्रत्येक देशाचा आणि तेथील प्रत्येक नागरिकाचा हातभार लागला पाहिजे. मानवी जीवनशैली आधुनिकता यामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होताना दिसत आहेत. नैसर्गिक संसाधनांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. मानवाच्या अमर्याद गरजा या नैसर्गिक साधनसंपदावर अवलंबून आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक संसाधनावर भार पडत आहे किंवा संसाधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे त्यामुळे मानवाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पर्यावरणावर परिणाम करणारे घटक यामध्ये लोकसंख्या वाढ हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. जगभरात या लोकसंख्या वाढीमुळे मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक घटकावर मोठा ताण निर्माण झाला आहे. सर्वप्रथम पर्यावरण दिनी शाळा आणि कार्यालय कामगार आणि विद्यार्थ्यांना झाडे लावण्यासाठी किंवा स्थानिक परिसर स्वच्छता करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे प्लास्टिक वर बंदी घालणे, पाण्याची बचत, पुनर्वापर ,वन्यजीव व प्राणी वाचवणे, नैसर्गिक संसाधनांचे रक्षण केले पाहिजे तरच मानव जात सृष्टी टिकून राहील, जंगलाचे रक्षण करणे गरजेचे तरच प्राणवायू भेटेल. जंगले तयार होण्यास हजारो वर्षाचा काळ लागतो तर तोडायला काही दिवस पुरतात हे आम्ही विसरत चाललो आहे. वृक्ष कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतात तर ऑक्सिजन पुरवतात जागतिक तापमान वाढ पासून आपल्याला वृक्षच वाचवतात झाडे ऊन वारा पाऊस सहन करतात आणि दुसऱ्यांना सावली देतात, लाकूड,फळे ,फुले, बिया, साल ,औषधी द्रव्य वृक्ष देतात. अनेक पक्षी, सजीव प्राणी, झाडांमुळे जगतात, मानवाला आता स्वतःच्या सवयी बदलण्याची गरज आहे. कागदांपेक्षा ई-मेल, इंटरनेटचा वापर करणे गरजेचे आहे किंवा ऑनलाईन चा वापर जास्त वाढविणे गरजेचे आहे. कमी ऊर्जेचे दिवे वापरून, कागदी वस्तू फेकण्याच्या ऐवजी चिनीमातीच्या वस्तू वापरणे आवश्यक आहे. पेपर नॅपकिन हा आज मोठ्या प्रमाणावर वापरला जात आहे त्याचे वापराचे प्रमाण कमी करता येऊ शकते, त्या ऐवजी सुती रुमाल टॉवेल वापरता येईल. पाण्याचा जपून वापर करणे फार गरजेचे आहे. त्याचबरोबर कचरा व्यवस्थापन करणे हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे तसेच हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, मृदा प्रदूषण म्हणजेच प्रदूषण होणार नाही याकडे मोठ्या प्रमाणावर लक्ष देणे आवश्यक आहे असे केले तरच पर्यावरणीय रक्षण होईल तरच मानवासमोरील पर्यावरणीय समस्या दूर होतील.

डॉ. निलेश काळे
टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय खडकी, पुणे.





 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!