पुणे दि.२६ (punetoday9news) : – कोरोना प्रतिबंधक उपाययोजना अधिक व्यापक करण्यासाठी शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अद्ययावत करणार असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज सांगितले. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे टाळा, अत्यावश्यक असेल तरच मास्क घालून व सुरक्षित अंतराचे पालन करुन व प्रशासनातर्फे वेळोवेळी देण्यात आलेच्या सूचनांचे पालन करुनच बाहेर पडा, असे आवाहनही त्यांनी केले.
जुन्नर नगरपरिषद सभागृहात जिल्हाधिकारी राम यांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी आमदार अतुक बेनके, नगराध्यक्ष श्याम पांडे, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपविभागीय अधिकारी रमा जोशी, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपाली खन्ना, तहसिलदार हनुमंत कोळेकर, पोलीस निरीक्षक युवराज मोहिते, तालुका आरोग्य अधिकारी प्रशांत खत्री, नगर अभियंता विवेक देशमुख आदीसह लोकप्रतिनिधी, नागरिक, शांतता समितीचे सदस्य, प्रशासकीय अधिकारी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राम म्हणाले, पुणे शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर, अनावश्यक घराबाहेर न पडणे आणि आजाराची लक्षणे जाणवल्यास कोविड केअर सेंटरमध्ये तपासणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राम यांनी केले.
कोरोनाला रोखण्यासोबतच काळजी घेण्याची हीच योग्य वेळ असल्याचे सांगून जिल्हाधिकारी राम म्हणाले, जुलै आणि ऑगस्ट अखेरपर्यंत रुग्णांची संभाव्य वाढती संख्या विचारात घेता रुग्णालयातील बेडची संख्या, ऑक्सिजन सिलेंडर उपलब्धतेचा आढावा घेतला जात असून आरोग्य यंत्रणाचे बळकटीकरण करताना पायाभूत सुविधा, आवश्यक मनुष्यबळ व निधी कमी पडणार नसल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच कोविड सेंटरमध्ये जैव-वैद्यकीय कचरा, भोजन व्यवस्था व आवश्यक सोई सुविधा तसेच उपचाराबाबत दक्षता घ्या. या संदर्भात कोणत्याही प्रकारची तक्रार येता कामा नये, अशा स्पष्ट सूचनाही जिल्हाधिकारी राम यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
प्रतिबंधित क्षेत्रातील अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्ती तसेच बाधित व्यक्तीच्या नजीकच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची कोरोना विषयक तपासणी होणे आवश्यक आहे. अशा तपासणीतून कोरोना संसर्गाचे लवकर निदान होवून त्यांच्यावर उपचार करणे सोपे होईल. तसेच कोरोना बाधित रुग्णाला घरी सोडल्यानंतर त्यांना आरोग्य विषयक कोणत्याही प्रकारचा त्रास होत असल्यास त्वरीत आरोग्य सुविधा पुरविण्यात यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी राम यांनी दिले. तसेच येणाऱ्या कालावधीतील सण-उत्सव साजरे करताना कोरोना संसर्गाबाबत शासनाच्या नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार अतुल बेनके यांनी जुन्नर तालुक्यात कोरोना संसर्गाबाबत नागरिकांनी दक्षता घेतली आहे. सण-उत्सव साजरे करताना सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्याची तालुक्याची परंपरा कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले, जुन्नर तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून यापुढील काळात अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सण-उत्सव साजरे करताना सुरक्षित अंतर, मास्कचा वापर, सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी याबाबत अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. नागरिकांनी यापुढेही कोरोना संसर्ग रोखण्यासाठी स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. आभार नगराध्यक्ष शाम पांडे यांनी मानले.
दरम्यान, मंचर येथील शासकीय विश्राम सभागृहात जिल्हाधिकारी राम यांनी आंबेगाव तालुक्यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचाही आढावा घेतला. यावेळी आंबेगाव तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणाचे प्रमुख उपस्थित होते.
Comments are closed