पिंपरी, प्रतिनिधी :
काँग्रेसने कर्नाटकमध्ये मिळविलेल्या विजयामुळे प्रेरित होऊन भाजपच्या भरत शंकरराव वाल्हेकर यांनी हॉटेल रागा येथे शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यावेळी काँग्रेस नेत्या सोनल पटेल, माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेस नेते पृथ्वीराज साठे, शहराध्यक्ष कैलास कदम, भरत वाल्हेकर, माजी महापौर कविचंद भाट, श्यामलाताई सोनवणे, निगारताई बारस्कर, अशोक मोरे, अभिमन्यू दहितुले, संग्राम तावडे, नरेंद्र बनसोडे, सायली नडे, विश्वास गजरमल, विश्वनाथ जगताप, विठ्ठल शिंदे, बाबु नायर, उमेश खंदार, माउली मलशेट्टी, कौस्तुभ नवले, विजय ओव्हाळ, भीकू खेनट, माधवराव मोहिते, इकबाल शेख उपस्थित होते.
यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, की काँग्रेसला मोठी परंपरा आहे. अगदी संतांचे विचार हेच काँग्रेसचे विचार आहेत. आज मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या पिंपरी चिंचवडला उभे करण्यात काँग्रेसचा मोठा वाटा आहे. काँग्रेसचा मोठा दबदबा होता. ते दिवस पुन्हा आणण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागावे. पिंपरी, चिंचवड व भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघात मोठी झेप घ्यायची आहे. काही महिन्यातच लोकसभा निवडणुका येत आहेत. या निवडणुकीत काँग्रेसला सत्तेवर बसविण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागले पाहिजे. त्यासाठी विविध सेलच्या माध्यमातून एकत्र येऊन नागरिकांमध्ये काँग्रेसची विचारधारा घेऊन जाण्याची आवश्यकता आहे.
कैलास कदम म्हणाले, की इंटकच्या माध्यमातून मोठे जाळे निर्माण झाले आहे. शहर काँग्रेसमध्ये पूर्वीचे दिवस आणण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन प्रयत्न सुरू आहेत. कर्नाटक निकालाने काँग्रेसमध्ये ऊर्जा निर्माण झाली असून, येत्या काही महिन्यात विविध पक्षातील चेहरे काँग्रेसमध्ये दिसतील. काँग्रेस मोठी भरारी घेईल, असा विश्वास आहे.
भरत वाल्हेकर म्हणाले, की काँग्रेस हा सर्व विचारधारांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांत शहर काँग्रेस विविध मुद्दे घेऊन मतदारांपुढे जाईल. काँग्रेस नेतृत्वाने विश्वास दाखविल्यानेच काँग्रेसमध्ये प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. हा विश्वास सार्थ ठरविणार आहे.
Comments are closed