पुणे दि. ११ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी) यांच्या संयुक्त विद्यमाने संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबर ‘संविधान दिंडी’ चे आयोजन करण्यात आले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या मुख्य संकल्पनेतून आणि समाज कल्याण विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे व बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांच्या मार्गदर्शनाखाली या ‘संविधान दिंडी’ चे आयोजन करण्यात आले आहे. याद्वारे रथाच्या माध्यमातून भाविकांमध्ये संविधानाची जनजागृती आणि प्रबोधन करण्यात येणार आहे.

वारकरी बांधवांना भारतीय संविधानाची माहिती व्हावी, आपले अधिकार, कर्तव्याची जाणीव व्हावी तसेच संतांच्या समतावादी विचारांचा प्रसार व्हावा हा या संविधान दिंडीचा हेतू आहे. भारतीय संविधानाबद्दल तीन प्रश्न विचारून विजेत्यांना भारतीय संविधानाची प्रत, संविधान प्रास्ताविका भेट देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. वारकरी बांधवांना भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाटप करून त्यांना भारतीय संविधानाबद्दल आपल्या मूलभूत अधिकार व कर्तव्याची माहिती देण्यात येत आहे.

वारकरी बांधव व नागरिकांना संविधानाच्या प्रास्ताविकाचे व बार्टी घडीपत्रिकेचे वाटप करून संविधान दिंडीचे महत्त्व विषद करण्यात येणार आहे. वारकरी दिंडीच्या मार्गाने वारकऱ्यांच्या विसाव्या ठिकाणी प्रबोधनात्मक, संविधान आधारित विविध उपक्रम, कार्यक्रम, शाहीरी जलसा यांचे आयोजन करण्यात येते. संविधान दिंडीमध्ये बार्टीचे अधिकारी व कर्मचारी, प्रकल्प अधिकारी व समतादूत यांचा समावेश असणार आहे.

पालखी सोहळ्यात संविधान दिंडीचा वारकरी बांधव व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी) यांच्यावतीने करण्यात आले आहे.

 




 




 

 

 

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!