राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त विशेष लेख.

आज राजर्षी शाहू महाराजांची 149 व्या जयंती. त्यानिमित्त आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा.स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात जवळपास 600 पेक्षा जास्त संस्थांनं होती.परंतु राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या वाट्याला जेवढं रयतेचे प्रेम आलं ते क्वचितच तत्कालीन एखाद्या संस्थानिकाला मिळालं असेल.राजर्षी शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला.त्यांचे मूळ नाव होते यशवंतराव.त्यांच्या वडिलांचे नाव होते जयसिंगराव घाडगे आणि आईचे नाव होते राधाबाई.1884 साली घाटगे घराण्यातले यशवंतराव कोल्हापूर गादीला छत्रपती पदाचे वारस म्हणून दत्तक आले.त्यांचे शिक्षण राजकोट व धारवाड या ठिकाणी झाले.सर एस एम फ्रेझर सारखे गुरु त्यांना मिळाले.2 एप्रिल 1894 ला त्यांचा विधिवत राज्याभिषेक झाला. राज्यकारभाराची सूत्रे हातात घेताच शाहू महाराजांनी आपल्या संपूर्ण राज्याचा दौरा केला.ज्या राज्याचा कारभार करायचा त्या राज्यातील प्रजेची सुख-दुःखं जाणून घेण्यासाठी त्यांना हा दौरा खूप उपयोगी पडला.सर्वसामान्य लोकांत मिसळणं,त्यांची सुख-दुःखं जाणून घेणं हा जणू त्यांचा आवडता छंदच होता.शेती,उद्योग,कला,क्रीडा,जलसंधारण,शिक्षण,जातिभेदनिर्मूलन इ सारख्या अनेक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.राजर्षी शाहू महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या केवळ गादीचे वारस नसून त्यांच्या विचारांचाही वारसा चालवणारा एक दृष्टा राजा होता.




शाहू महाराजांनी शेतकरी हिताच्या कित्येक योजना राबवल्या.शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावं म्हणून त्यांनी भोगावती नदीवर राधानगरी नावाचं त्या काळातलं सर्वात मोठं धरण बांधलं. शेतकऱ्यांसाठी शाहूपुरी ही गुळाची बाजारपेठ वसवली.शेतकरी कष्टकरी समाजाचे दुःख जाणणाऱ्या या राजाने आपल्या राज्यातील तोफा वितळवून त्याचं लोखंड शेतकऱ्यांना लागणारे नांगर बनवण्यासाठी वापरलं.1897 साली संपूर्ण भारतात प्लेगची साथ पसरली होती.प्लेगने सगळीकडे थैमान घातलं होतं अनेक माणसं मरत होती.गावं सोडून अक्षरश: परागांदा होत होती.परंतु शाहू महाराजांच्या अचूक नियोजनामुळे भारतात त्या काळात सर्वात कमी मनुष्यहानी कोल्हापूर राज्यात झाली.प्लेग आणि दुष्काळ या क्रूरचक्रात अडकलेल्या रयतेला शाहू महाराजांच्या मानवतावादी दृष्टिकोनाने दिलासा दिला.1899 साली घडलेल्या वेदोक्त प्रकरणामुळे केवळ शाहू महाराजांच्या वैयक्तिक आयुष्यातच नाही तर संपूर्ण कोल्हापूरच्या समाजजीवनात प्रचंड उलथापालथ झाली.वेदोक्त प्रकरणाप्रसंगी अनेक तथाकथित राष्ट्रीय नेत्यांनी आपल्या वर्णवर्चस्वाचा विकृत हुंकार काढलेला शाहू राजांनी पाहिला.माणसा-माणसात भेदभाव करणाऱ्या धर्मापेक्षा माणुसकीचा धर्म त्यांनी श्रेष्ठ मानला.


बहुजन समाजाला पुढारलेल्या समाजासोबत आणण्यासाठी त्यांनी 26 जुलै 1902 रोजी आपल्या प्रशासनातील 50 टक्के जागा आरक्षित करण्याचा निर्णय घेतला. “माझ्या राज्यातील प्रजा फक्त तिसरीपर्यंत जरी शिकली ना,तर मी माझं राजेपद आनंदाने सोडायला तयार आहे” असे ते नेहमी म्हणायचे. शिक्षणाशिवाय माणसाच्या आयुष्याचा कायापालट होणार नाही हे शाहू महाराजांनी जाणलं होतं.खेड्यापाड्यातून कोल्हापुरात शिकायला येणाऱ्या मुलांना राहण्याची व जेवणाची सोय नसायची.म्हणून त्यांनी वसतीगृहाची संकल्पना राबवली.सुरुवातीच्या काळात त्यांनी सर्व जाती-धर्माच्या मुलासाठी एकच वसतीगृह सुरू केलं.परंतु सवर्ण जातीतील मुलं इतर जातीय मुलांना सामावून घेत नव्हती.त्यांना टिकू देत नव्हती.म्हणून शाहू महाराजांनी जातीच्या एकोप्याने तरी मुलं शिकतील म्हणून कोल्हापुरात जातवार वसतीगृहांची स्थापना केली.जसं इंग्लंडला ‘मदर ऑफ पार्लमेंट हाऊसेस’ म्हटलं जातं तसं कोल्हापूरला ‘मदर ऑफ बोर्डिंग’म्हटलं जातं.शाहू महाराजांनी कोल्हापुरात मराठा बोर्डिंग,मुस्लिम बोर्डिंग,जैन बोर्डिंग,दैवज्ञ बोर्डिंग,अस्पृश्यासाठीचे मिस क्लार्क होस्टेल इ.सारखी तब्बल 23 वस्तीगृह सुरू केली.शाहू महाराजांनी केवळ कोल्हापुरातच नाही तर पुणे ,नाशिक,नगर,पंढरपूर,नागपूर या ठिकाणी वसतीगृह उभारण्यासाठी भरीव आर्थिक मदत केली.

पासवर्ड विसरलात? चिंता नको पासवर्ड शोधण्याची सोपी ट्रिक.

शाहू महाराजांनी सुरू केलेल्या वसतीगृहात शिकलेल्या संपूर्ण पिढीने समाज उभारणीच्या कार्यात मोलाचे योगदान दिलं.शाहू महाराजांच्या काळात ब्रिटिश सरकारचं संपूर्ण भारताचे प्राथमिक शिक्षणाचे बजेट होतं फक्त 98 हजार रुपये.तर एकट्या कोल्हापूर संस्थानचं प्राथमिक शिक्षणाचे बजेट होतं एक लाख रुपये.1917 ला राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करणारा जाहीरनामा काढला.एवढेच करून ते थांबले नाहीत तर जे आई-वडील आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्यांना महिन्याला 1 रुपया दंड ठोठावण्याची तरतूदही या कायद्यात त्यांनी केली.ब्रिटिश राजवटीने कोल्हापूर गादीवर अनेक मर्यादा आणल्या होत्या.तरीसुद्धा शाहू महाराजांनी आपल्या छोट्याशा कोल्हापूर राज्यात लोकहिताच्या अनेक क्रांतिकारी योजना राबवल्या.शाहू महाराज शरीराने जसे धिप्पाड होते.तसेच ते उमद्या मनाचे व अतिशय दिलदार होते.शाहू महाराजांनी अनेक विद्वानांना मदत केली.त्यापैकी एक म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर.1920 साली भरलेल्या माणगांवच्या पहिल्या अस्पृश्यता परिषदेमध्ये आपल्या भाषणात शाहू महाराज म्हणाले,”बरं झालं तुम्ही तुमचा पुढारी शोधून काढला.माझी खात्री आहे बाबासाहेब आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत.इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की ते सर्व हिंदुस्तानचे पुढारी होतील.”पुढे शाहू महाराजांचे व डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले.डॉ बाबासाहेब आंबेडकर 1920 साली बाबासाहेबांना मूकनायक नावाचे पाक्षिक सुरू करण्यासाठी शाहू महाराजांनी 2500रु ची भरीव मदत केली.त्यावेळी सोने 13 रु तोळा मिळत असे.बाबासाहेबांना परदेशात शिकायला जाण्याची इच्छा होती.त्यासाठी महाराजांनी त्यांना शिष्यवृत्ती दिली.जातीभेद निर्मूलनासाठी व समता प्रस्थापित करण्यासाठी शाहू महाराजांनी खूप संघर्ष केला.गंगाराम कांबळेला कोल्हापुरात सत्यसुधारक हॉटेल सुरू करण्यासाठी शाहू महाराजांनी मदत केली.एवढेच नाही तर ते स्वतः गंगाराम कांबळे यांनी बनवलेला चहा प्यायचे. “अस्पृश्य हा शब्द ऐकला, की माझ्या कानात पोलादी जस्त ओतल्यासारखं भाजतो.अस्पृश्य म्हणणाऱ्यावर कोर्टात प्रॉसिक्युशन का दाखल करू नये”.असं ते नेहमी म्हणायचे त्यांनी अस्पृश्यांसाठी ‘सोमवंशीय’ हा नवीन शब्द रूढ केला.दलितांच्या मांडीला मांडी लावून हा राजा जेवायचा.त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना कोल्हापुरात येण्याचे निमंत्रण दिलं.त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली.छत्रपतींचा जरीपटका त्यांच्या डोक्यावरती बांधून त्यांचा सन्मान केला.त्यांनी कोल्हापुरात अनेक कलाकारांना राजाश्रय दिला.कलामहर्षी बाबुराव पेंटर,आबालाल रहेमान,संगीत सूर्य केशवराव भोसले,गायक अल्लादिया खॉं,शाहीर लहरी हैदर यांसारख्या अनेक कलाकारांवर शाहू राजांनी भरभरून प्रेम केलं. बालगंधर्व,ज्यांना एका कानाने कमी ऐकायला येत होतं.त्यांच्यावर स्वखर्चाने मिरजच्या मिशन हॉस्पिटलमध्ये उपचार केले.म्हणूनच शाहू महाराजांच्या काळात कोल्हापूरची कलापूर अशी ओळख निर्माण झाली.शाहू महाराजांनी कुस्तीला राजाश्रय दिला या काळातच कोल्हापुरात अनेक मल्ल तयार झाले ज्यांनी उत्तर भारतातल्या अनेक नामांकित मल्लांना आसमान दाखवलं शाहू महाराजांना जसा शिकारीचा शौक होता तसंच त्यांनी अनेक प्राण्यांवर मनापासून प्रेम केलं.शाहू महाराजांनी भटक्या विमुक्त जातीच्या लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांच्यावरची हजेरीची क्रूर प्रथा रद्द केली.

इलेक्ट्रिक रिक्षांकरिता पुणे महापालिकेकडून मिळणार २५ हजार रुपये अनुदान

कोल्हापुरातील हवामान विचारात घेता आसामचा चहा शाहू महाराजांनी कोल्हापुरात आणून त्याची लागवड केली.संपूर्ण भारतात कोल्हापूर टी अल्पावधीतच अतिशय लोकप्रिय झाला.बडोद्याच्या सयाजीराव महाराज तर कोल्हापूर टी शिवाय दुसरा चहाच पीत नव्हते.1921 साली इंग्लंडच्या प्रिन्स ऑफ वेल्सच्या हस्ते पुणे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातला पहिला पुतळा राजर्षी शाहू महाराजांनी उभारला.छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिण्यासाठी त्यांनी कृष्णराव अर्जुन केळुस्कर गुरुजींना आर्थिक मदत केली.ते शिवचरित्र लिहून झाल्यानंतर त्याच्या साडेतीन हजार प्रति विकत घेऊन देशभरातल्या सर्व ग्रंथालयांना मोफत पाठवल्या.प्रबोधनकार ठाकरे आणि राजर्षी शाहू महाराजांचे यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते.शाहू महाराजांनी स्त्रियांचा सन्मान केला.प्रिन्स शिवाजी या आपल्या लाडक्या राजपुत्राच्या अकाली निधनानंतर त्यांनी आपल्या सुनबाई इंदुमती राणीसाहेबांना शिकवलं व अत्यंत सन्मानाने वागवलं.

भरती : सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहामध्ये कर्मचारी भरती ; १० जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन.

त्या काळात त्या स्वतः चारचाकी गाडी चालवत प्रवास करायच्या.शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले.त्यांच्या भगिनी चंद्रप्रभादेवी यांचा विवाह त्यांनी इंदोरच्या यशवंतराव होळकर यांच्यासोबत निश्चित केला.परंतु तो विवाह संपन्न होण्यापूर्वी शाहू महाराजांचा निधन झालं.पुढे तो विवाह त्यांचे चिरंजीव राजारामराजे छत्रपती यांनी पार पाडला.वेदोक्त प्रकरणाने दुखावलेल्या राजर्षी शाहू महाराजांनी स्वतंत्र धर्मपीठाची स्थापना केली.शाहू महाराजांनी धर्माच्या क्षेत्रात केलेली ही क्रांती होती.सदाशिव लक्ष्मणराव पाटील बेनाडीकर या उच्चशिक्षित तरुणाला त्यांनी क्षात्रजगद्गुरु म्हणून नेमलं.पुरोहित पाठशाळेतून बहुजन समाजाचे पुरोहित तयार करण्याचं क्रांतिकारी कार्य राजर्षी शाहू महाराजांनी केलं.यासाठी ना.भास्करराव जाधवांनी लिहिलेलं ‘घरचा पुरोहित’ हे पुस्तक महत्त्वपूर्ण ठरलं.

वृक्षमित्र अरुण पवार यांचा ‘धारूररत्न पुरस्कारा’ने गौरव 

कोल्हापूर गादीवर 28 वर्ष राज्यकारभार केलेल्या छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या प्रजेवर पोटच्या लेकरासारखं प्रेम केलं.”राजसत्ता ही केवळ सुखोपभोगण्यासाठी नसून ती प्रजेच्या हितासाठी राबवायचे असते”असं ते नेहमी म्हणायचे. राजवाड्यातील शाही ऐश-आराम उपभोगण्यापेक्षा गोरगरीब जनतेच्या झोपडीतील चटणी-भाकर हा राजा अत्यंत आनंदाने खायचा.म्हणून तर उत्तरप्रदेशातील कानपुर येथे भरलेल्या कुर्मी अधिवेशनात तेथील जनतेनं मोठ्या प्रेमानं त्यांना ‘राजर्षी’ म्हणजे ‘ऋषीतुल्य राजा’अशी पदवी दिली. शाहू महाराजांनी जाती-धर्मातील तेढ कमी करून समाजामध्ये समता प्रस्थापित करण्यासाठी आपला देह हयातभर झिजवला.आज राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी करत असताना शाहू महाराजांचा समतेचा विचार तळागाळात रुजवण्याचा संकल्प करणे हेच शाहू महाराजांना खरे अभिवादन ठरेल.
– प्रा विक्रम कदम,सातारा.


पाचवी, आठवी ; व्हायचय पास तर करावाच लागेल अभ्यास.

सोप्या भाषेत: आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय? सध्या खूप जास्त चर्चेत असलेले तंत्रज्ञान.

आपल्या मधुर आवाजाने मंत्रमुग्ध करणारा पक्षी

#

Comments are closed

error: Content is protected !!