इतिहास नुसता तोंडाने सांगायचा नसतो तर त्या त्या वयात तो अनुभवायचा देखील असतो.जिथं जिथं महाराजांचे पाय लागले,ती सर्व ठिकाणं किमान एकदा तरी पहायची,तिथली माती आपल्या मस्तकावर लावायची,हा खूप वर्षांपूर्वी केलेला संकल्प आहे.
दि 22 व 23 जुलै 2023 रोजी पन्हाळा ते पावनखिंड हा ट्रेक केला.छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावरून विशाळगडावर ज्या प्राचीन फरसबंदी मार्गाने गेले तो अनुभव घ्यावा, हे खूप दिवसापासून मनात होतं.12 आणि 13 जुलै 1660 चा प्रसंग पुस्तकातून वाचताना आजही अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहतात. शत्रू पाठीवर असताना महाराज आणि मावळे रात्रीच्या अंधारात मुसळधार पावसात या खडतर वाटेवरून कसे गेले असतील? यासारखे कित्येक प्रश्न या वाटेवरून चालताना सातत्याने मनात येत होते.पन्हाळ्यावर पोचल्या पोहोचल्या पाऊस जणू काय आमच्या स्वागतासाठी उभाच होता. पडत्या पावसात पन्हाळ्यावरील बाजीप्रभूंच्या पुतळ्यापासून या ट्रेकची सुरुवात झाली. प्राचीन फरसबंदी मार्गाने प्रवास करताना त्याचं जतन करण्यासाठी शासन स्तरावर कोणतेही प्रयत्न होत नाहीत. हे सगळं जपलं पाहिजे.रस्त्यात अनेक अज्ञात समाधी लागतात त्याचंही अधिक संशोधन झालं पाहिजे.ज्या राजदिंडी मार्गाने महाराज गडउतार झाले तिथून निसरड्या वाटेने चालत आम्ही पन्हाळ्यावरून खाली उतरताच तुरूकवाडी व म्हाळुंगे या गावाच्या समोर लागले ते मसाई पठार. हा पहिल्या दिवसाच्या प्रवासाचा महत्वाचा टप्पा होता. मसाई पठार चढताना पावसाळ्यात वासोटा किल्ला चढतोय असंच वाटतं.पठारावरील मसाई देवीच्या मंदिराच्या पुढे साताऱ्यातील सडावाघापूर सारखे किंबहुना त्यापेक्षा जास्त मोठे हवेच्या खालून वर असणाऱ्या दाबामुळे अनेक उलटे धबधबे पाहण्यास मिळाले. मसाई पठार उतरल्यानंतर दुपारचं जेवण खोतवाडी या ठिकाणी केलं.हा मार्ग म्हणजे आजही उताराचा निसरडा रस्ता,छोटे – मोठे नाले,ओहोळ,ओढे आणि भातशेतीच्या खाचरातील पाण्यातून प्रवास करावा लागतो,मग त्या काळात तर काय परिस्थिती असेल.चालता चालता शिवरायांच्या विचारांचा जागर करत करत मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो.
. दुसऱ्या दिवशी करपेवाडीतुन सकाळी 6 वा. पुढच्या प्रवासाला निघालो. निलगिरीच्या जंगलातून हा आनंददायी आणि थरारक प्रवास सुरू झाला.22 जुलै च्या तुलनेत रविवार 23 जुलै रोजी तुलनेने प्रचंड मुसळधार पाऊस अनुभवायला मिळाला.एवढं अंतर चालत असताना सुद्धा तहान लागत नव्हती.कारण कोसळणाऱ्या पावसाचे थेंब नकळत तहान भागवत होते.वाटेने दहा-बारा वर्षाच्या मुलांपासून ते साठ-पासष्ट वर्षांच्या स्त्रियांपर्यंत अनेक सहप्रवासी दिसले. कित्येक जण तर या मोहिमेत सहकुटुंब सहभागी झाले होते.सिमेंटची जंगलं पाहण्याची सवय झालेली माणसं निसर्गाची नानाविध रूपं कॅमेऱ्यासोबतच हृदयातही साठवत होती.पन्हाळा ते करपेवाडी या पहिल्या दिवसाच्या प्रवासात केवळ 3 ओढे लागले.पण करपेवाडी ते पावनखिंड या दुसऱ्या दिवशी लहान-मोठे मिळून 63 ओढे म्हणजे 2 दिवसात 66 ओढे ओलांढून जावं लागलं.यातील दहा-बारा ओढ्यांवर आज पूल आहेत.पण ते महाराजांच्या काळात नव्हते.
JOB : फ्रेशर्स वेब डेव्हलपर्ससाठी सुवर्णसंधी.
कार्यकर्त्यांना ताकद देण्याची भूमिका ठेवणार – नवनियुक्त शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा विश्वास
आंबेवाडी,कळकेवाडी,माळवाडी ही रस्त्यातील छोटी गावे ओलांढून पाटेवाडी, धनगरवाडा, सुकामाचा, म्हसवडे आणि मानवाड मार्गे हा आनंददायी प्रवास सुरू राहीला.सरतेशेवटी दुपारी दीड वाजता आम्ही पांढरेपाणी गावात पोचलो.पांढरेपाणी गावाचं जुनं नाव चौकवाडी असं होतं.गावातून दोन ओढे वाहताना त्यांचं फेसाळणारं पाणी पांढरं दिसतं म्हणून हे गाव पुढे पांढरेपाणी या नावाने ओळखले जाऊ लागले असे मानले जाते. इतिहासलेखनशास्त्रात मौखिक साधनालाही महत्व आहे.
या गावात असणाऱ्या शिवकालीन विहिरीबद्दल एक कथा इथल्या स्थानिक लोकांनी पिढ्यान पिढ्या मौखिक रुपात जपली आहे.छत्रपती शिवाजी महाराज या प्रवासात विश्रांतीसाठी पांढरेपाणी या गावात थांबल्यावर त्यांनी भूक लागली. तिथल्या एका वृद्ध स्त्रीने महाराजांना खायला भाकरी दिली. महाराजांनी ती आनंदाने खाल्ली आणि त्या आजीला काय पाहिजे ते सांग अस निरोप मावळ्यांजवळ दिला. त्यावेळी ती म्हातारी आजी म्हणाली “मला काय बी नको, पण गावातील लेकीबाळींना पाण्यासाठी लय वणवण हिंडावं लागतंय,राजांना सांगा लेकीबाळींसाठी एक विहीर बांधून द्यायला.” महाराजांनी ही गोष्ट स्मरणात ठेवून त्या ठिकाणी एक विहीर खोदून दिली.त्या शिवकालीन विहिरीचं पाणी आजही तिथले गावकरी पिण्यासाठी वापरतात.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची पिंपरी चिंचवड शहर कार्यकारणी जाहीर
पुढे पांढरेपाणी गावातून 4 किमी अंतरावर असणाऱ्या धारातीर्थ पावनखिंडीत पोचल्यावर इतिहासाचा सगळा पट डोळ्यासमोर उभा राहिला.आता जी पावनखिंड म्हणून दाखवतात ते कासारी नदीचं उगमस्थानही आहे.इथं प्रचंड वेगानं वाहणारं पाणी असल्यामुळं सुरक्षिततेसाठी खाली जाण्याचा रस्ता हल्ली बंद ठेवला जातो.याच घोडखिंडीत 13 जुलै 1660 रोजी अनेक रणमर्दांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता असामान्य शौर्य गाजवलं.त्यांच्याच रक्तानं गजापूरची घोडखिंड ही पावनखिंड झाली.निस्वार्थ वृत्ती,पराकोटीची त्यागभावना व कमालीची शिवनिष्ठा यासारख्या आभूषणांनी युक्त अनेक जाती – धर्माच्या मावळ्यांनी स्वराज्यरुपी शिवपिंडीवर रक्ताभिषेक केला आहे.म्हणून तर रयतेच्या स्वाभिमानाचे लचके तोडू पाहणाऱ्या अनेक पातशाह्या पालथ्या घालून छत्रपती शिवाजी महाराज हे देखणं स्वराज्यमंदिर उभारु शकले.सिद्धी जोहरचा जावई सिद्धी मसूद पाठलाग करत होता.त्याची फौज प्रचंड होती.त्याला रोखायचं तर गजापूरच्या घोडखिंडीशिवाय उत्तम जागा नाही हे सर्वजण जाणून होते.बांदलांची सेना महाराज विशाळगडावर पोहोचेपर्यंत अविरतपणे लढत राहिली.रयतेचा राजा विशाळगडावर सुखरूप पोहोचावा म्हणून अनेक वीरांनी गजापूरच्या घोडखिंडीतील मातीत आपल्या रक्ताने अभिषेक केला.आजही तिथली माती उगाच नाही लाल दिसत.त्या मातीत कित्येक नरवीरांचं रक्त मिसळलेलं आहे. या बहाद्दर मावळ्यांनी विशालगडावर तोफेचे बार झाल्याशिवाय आपली जागा सोडली नाही., शंभुसिंह जाधव(सरसेनापती धनाजी जाधव यांचे वडील),बाजीप्रभू व फुलाजीप्रभू देशपांडे रायाजी बांदल,बाजी बांदल यांच्यासह बांदल सेनेतील अनेक वीर,ज्यांची नावेसुद्धा इतिहासाला माहीत नाहीत असे कित्येक पराक्रमी मावळे कटुन गेले,पण मागे नाही हटले.त्या सर्व ज्ञात-अज्ञात वीरांचं स्मारक म्हणजे धारातीर्थ पावनखिंड.अनेक जिवलग मित्रांच्या सहवासात हा ट्रेक करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा व मावळ्यांचा पराक्रम पाहताना ऊर अभिमानाने भरून आला.शिवभक्तांनी पन्हाळा ते पावनखिंड हा ट्रेक एकदातरी करावाच.
– विक्रम कदम,सातारा. +91 7588059567
Comments are closed