पुणे, दि. २७( punetoday9news):- पुणे जिल्हयातील ‘कोरोना’ बाधित संभाव्य रुग्णसंख्या लक्षात घेवून तातडीने तीन ठिकाणी जम्बो रुग्णालयांची उभारणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, खासगी दवाखान्यातून कोरोना उपचाराची मोठ्या रक्कमांची बिले आकारली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. खासगी रुग्णालयाचे बिल स्वतंत्र लेखा परीक्षकांच्या माध्यमातून तपासली जातील. शासनाच्या नियमानुसार उपचारांची दर आकारणी केली आहे का, याची शहानिशा करूनच रुग्णाला बिल दिले जावे, याबाबत सबंधित यंत्रणेने दक्षता घेण्याच्या स्पष्ट सूचनाही पवार यांनी दिल्या.
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रादुर्भाव आणखी वाढणार नाही, याबाबतची दक्षता घ्यावी लागणार आहे. पुणे शहरासह जिल्हयातील ऑगस्ट अखेरची स्थिती विचारात घेत गतीने नियोजन करावे लागणार आहे. कोरोना प्रतिबंधक उपाययोजना सोबतच आरोग्य विषयक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगतानाच कोरोना प्रतिबंधक तातडीच्या उपाययोजनांसाठी तसेच मंत्रालयस्तरावरील प्रश्न तातडीने मार्गी लावणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.
Comments are closed