लहान मुले ठरताहेत भटक्या कुत्र्यांची टार्गेट
● महापालिकेच्या अनास्थेमुळे वाढलीय भटक्या कुत्र्यांची संख्या.
● भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची रामभाऊ जाधव यांची मागणी.
पिंपरी, प्रतिनिधी :
सांगवीसह, खडकी, रेंजहिल, पिंपळे गुरव, दापोडी परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत माजली आहे. खडकी बाजार येथे नुकतेच तेरा वर्षाच्या मुलावर तीन कुत्र्यांनी एकाच वेळी हल्ला केल्याने मुलाला मोठी जखम झाली आहे. एखाद्याचा जीव गेल्यावरच प्रशासन याकडे लक्ष केंद्रित करणार आहात का ? असा सवाल छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांनी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासन व महापालिका प्रशासनाला केला आहे.
कुत्र्याने मुलाच्या हाताला तीन चार ठिकाणी कडाडून चावा घेतला. त्यात बालक जखमी झाला आहे. अभिजीत भोसले असे या मुलाचे नाव असून, भर बाजारपेठेत हे कुत्रे येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर धावून जात आहेत. त्यामुळे या परिसरातील मोकाट कुत्र्यांना वेळीच आवर घालण्याची गरज आहे. अन्यथा या कुत्र्यांचा अनेकांना त्रास होणार आहे.
नागरिकांनी कुत्र्याला हुसकावून लावल्याने सुदैवाने या बालकाची सुटका झाली. मुलाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. या कुत्र्याचा चावा इतका भयंकर होता की, कुत्र्याने त्या बालकाच्या हाताचे लचके तोडले आहेत. या आधीही पिंपळे गुरवच्या गजानन नगरमध्ये एका बालकाची कुत्र्याच्या तावडीतून नागरिकांनी सुटका केली आहे. मात्र, हा प्रश्न कायमस्वरूपी सुटायला हवा, अशी मागणीही रामभाऊ जाधव यांनी केली आहे.
याआधीही परिसरात अनेक जणांना येथील भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. नागरिकांनी वारंवार अधिकाऱ्यांकडे याबत तक्रार केली. मात्र, अधिकारी गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे परिसरातील नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. हे कुत्रे आणखी किती जणांचा चावा घेणार आहेत ? एखाद्याचा जीव गेल्यावरच प्रशासन याकडे लक्ष केंद्रित करणार आहात का?
– रामभाऊ जाधव, पुणे जिल्हाप्रमुख, छावा मराठा संघटना .
Comments are closed