पिंपरी,दि.१३ :- पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, शिशुविहार प्राथमिक विद्यालय, आकुर्डी, पुणे-४४ या विद्यालयात या वर्षीच्या गणेशोत्सवानिमित्त पालक व विद्यार्थी यांच्यासाठी एक आगळा- वेगळा उपक्रम घेण्यात आला.
यावर्षी विद्यार्थी व पालक यांच्या कलागुणांना, रंगभरण, सजावट करणे, नीटनेटकेपणा, व्यवस्थितपणा या गुणांना वाव मिळावा यासाठी श्री मोरया फाउंडेशन व शिशुविहार विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण पूरक शाडू मातीची गणेश मूर्ती रंगविणे हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
यासाठी प्रथम मोरया फाउंडेशन च्या वतीने विद्यालयास मूर्ती उपलब्ध करून देण्यात आल्या.शाळेच्या हॉल मध्ये सहभागी सर्व पालक व विद्यार्थी यांना ओळीने बसवून घेतले,विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका मोहिते मॅडम, उपशिक्षक – कदम प्रकाश , उपशिक्षिका सुलभा दरेकर, वनिता गायकवाड ,पालक प्रतिनिधी- शशिकांत चव्हाण, उंबरकर यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून या उपक्रमास सुरुवात करण्यात आली.
मार्गदर्शक शिक्षक- प्रकाश कदम, सुलभा दरेकर व वनिता गायकवाड यांनी मुलांच्या मदतीने सर्व पालकांना मूर्ती वाटप केली. उपशिक्षक- प्रकाश कदम यांनी सर्व पालकांना मूर्ती रंगविण्याबाबत सूचना दिल्या,त्यानंतर मुख्याद्यापिका श्रीमती काळे योगिता यांनी उपक्रमासाठी व छान मूर्ती रंगविण्यासाठी सर्व पालकांना शुभेच्छा दिल्या.
सर्वच पालकांनी स्वतःच्या कल्पनेने,युक्तीने,कलेने एकदम सुंदर रंगांनी गणेश मूर्ती रंगविल्या, याचा आनंद पालक व विद्यार्थी यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.सर्वांच्या मूर्ती रंगवून झाल्यानंतर सर्व मूर्तींचे परीक्षण चित्रकार,आर्टिस्ट उपशिक्षक- विश्वकर्मा चव्हाण यांनी केले.प्रथम,द्वितीय व तृतीय असे तीन क्रमांक व दोन उत्तेजनार्थ क्रमांक काढण्यात आले,बक्षीस पात्र विद्यार्थी व पालक यांना शाळेच्या मोठ्या कार्यक्रमात ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
शेवटी सर्व पालक व विद्यार्थी यांचे एकत्र रंगविलेल्या मूर्तीसोबत फोटो काढण्यात आले.सर्वच पालकांनी उपक्रमाबाबत व शाळेबाबत एकदम उस्फुर्त व बोलक्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
अशा प्रकारे हा गणेश मूर्ती रंगविण्याचा आगळा-वेगळा व पालकांच्या कलेला वाव देणारा उपक्रम मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात, आनंदात पार पडला.
Comments are closed