चांगले खेळाडू तयार करण्यासाठी मोलाचे योगदान व्हावे-उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे, दि. २५,दि.२५ :- महाराष्ट्रातील खेळाडू देशपातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकावेत यासाठी ‘मास्टर स्ट्रोक’ क्रीडा पाक्षिकाच्या माध्यमातून चांगले खेळाडू तयार करण्यास मोलाचे योगदान व्हावे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
‘मास्टर स्ट्रोक’ या मराठी क्रीडा पाक्षिकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री बोलत होते. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, पाक्षिकाचे संपादक माधव दिवाण, विश्वस्त अभिषेक बोके, कसबा गणपती ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, अखिल मंडई गणेश मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, क्रीडा क्षेत्राला वाहिलेले, महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राला गती देण्यासाठी आणि क्रीडा संस्कृतीची मुळे रूजविण्यासाठी हे पाक्षिक सेवेत रूजू होत असल्याचा आनंद आहे. राज्यातील ग्रामीण भागातील चांगले खेळाडू शोधून त्यांना घडविण्याचे कार्य ‘मास्टर स्ट्रोक’ ने करावे. महाराष्ट्राला चांगल्या खेळाडूंची परंपरा आहे. कुस्ती, क्रिकेट आणि कबड्डी यासारख्या खेळामध्ये महाराष्ट्राला गौरवशाली परंपरा लाभली आहे. महाराष्ट्राने आजपर्यंत चांगले क्रीडा पत्रकार दिले आहेत. त्याचप्रमाणे ‘मास्ट्रर स्ट्रोक’नेही कार्य करावे. हा काळ ब्रेकिंग न्यूजचा आहे. मास्टर स्ट्रोकने याबाबतीत मागे राहू नये.
ते पुढे म्हणाले, बालेवाडी येथे ऑलिम्पिक भवन उभारणीसाठी सुमारे ७५ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याला मूर्तस्वरूप देण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच भूमिपूजनाचा कार्यक्रम घेतला जाईल. २०२८ च्या ऑलिम्पिक स्पर्धा समोर ठेवून आपणाला तयारी करावयाची आहे. त्यासाठी क्रीडा विभागाने काम उत्तम करावे, कोणत्याही खेळाडूवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी. देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवूण देणाऱ्या स्व. खशाबा जाधव यांचा जन्मदिन आपण राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
खेळाडूंच्या आरक्षणाचे प्रश्न तसेच शासकीय सेवेत खेळाडूंच्या नियुक्तीचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न केले जातील. चांगले खेळाडू निर्माण करण्यासाठी चांगल्या प्रशिक्षकांची गरज आहे, असे सांगून क्रीडा विभागाच्या पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीही पवार यांनी यावेळी दिली.
यावेळी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या खेळाडूंचा उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Comments are closed