पिंपरी:- पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शिशुविहार प्राथमिक विद्यालय आकुर्डीे ४४,या विद्यालयात प्रत्येक सण,उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरे केले जातात.हिंदू संस्कृतीत आराध्य दैवत म्हणून गणरायाला संबोधले जाते.हीच परंपरा टिकावी यासाठी मुख्याध्यापिका काळे योगिता यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम मुख्याध्यापिका काळे व ज्येष्ठ शिक्षक मनोज मेदनकर सर यांच्या हस्ते इयत्ता-तिसरीच्या विद्यार्थ्यांनी रंगविलेल्या गणरायाच्या मूर्तीचे व पहिलीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गणरायाच्या कोलाज कामाच्या चित्रांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
पूर्व प्राथमिक विभागातील शिक्षिका मंजुषा बावधनकर यांनी विद्यार्थ्यांना श्री गणेशाच्या विविध कथा सांगून दहा दिवस गणपती का बसविला जातो ? याची माहिती सांगितली.तदनंतर सर्व विद्यार्थ्यांनी गणपतीची आरती म्हटली.इयत्ता चौथीच्या काही विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पा वर आधारित नृत्य सादर केले. या गणेशोत्सवाचे औचित्य साधून विद्यालयात पालक व विद्यार्थी यांच्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते,त्यामध्ये पूर्व प्राथमिक विभाग-रांगोळी स्पर्धा,इयत्ता-पहिली व दुसरी-सॅलेड डेकोरेशन स्पर्धा,इयत्ता तिसरी-शाडूची गणेश मूर्ती रंगविणे,इयत्ता चौथी-गणपतीसाठी मखर बनविणे, यासारखे उपक्रम पालक व विद्यार्थी यांच्यासाठी आयोजित केले होते,त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवाचा मनमुराद आनंद घेतला. उपशिक्षक ढोले नंदकिशोर यांनी सूत्रसंचलन व आभार व्यक्त केले.अशाप्रकारे गणेशोत्सव हा कार्यक्रम शिशुविहारमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला.
Comments are closed