आपल्या देशात जेष्ठ नागरिकांची संख्या प्रचंड वाढलत चालली आहे.अलिकडेच्या उपलब्ध माहितीनुसार देशात जेष्ठ नागरिकांचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या १८ टक्क्यांचे वर आहे.यापुढेही हे प्रमाण वाढत जाणार यात संदेह नाही..
अलिकडे जगातील सर्वच देशांत लोकांचा मृत्यूदर (Mortality) वाढत चालली आहे. म्हणजेच लोकांचे आयुर्मान अलिकडे वाढत चालले आहे. आलिकडच्या संशोधनातून जागतिक पातळीवर माणसाच्या मृत्यूच्या सरासरी वयाचे निष्कर्ष उपलब्ध आहेत.मृत्युदर म्हणजेच मृत्यूचे सरासरी वय. १९३० साली मृत्यूचे सरासरी वय ४७ होते आता मात्र मृत्युचे सरासरी वय ७० च्या पुढे गेले आहे.म्हणजे अलिकडे लोकांचे आयुर्मान वाढत चालले आहे. याची प्रमुख कारणे महत्वाची आहेत. अलिकडेच काही वर्षांत
आरोग्य क्षेत्रात झालेला प्रचंड विकास, संशोधनातून उपलब्ध झालेली आधुनिक प्रगत उपचार पद्धती आणि उपलब्ध प्रभावी औषधे, यामुळे आजारांवर मात करणे मोठ्या प्रमाणात शक्य झाले आहे. त्याप्रमाणे सर्वच लोकांमध्ये निरोगी जीवनासाठी झालेली मोठी जागृती,व्यायाम तसेच योगा यांचे बहुतेकांनी स्विकारलेले महत्त्व यामुळे लोकांचे आयुर्मान वाढत चालले आहे.
ज्येष्ठांच्या वाढत्या लोकसंख्येबरोबरच त्यांचे अनेकविध प्रश्न समोर येऊ लागले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने कौटुंबिक आणि सामाजिक संरक्षण, सामाजिक सन्मान, आरोग्याचे प्रश्न, आर्थिक पाठबळ यांसारख्या अनेक समस्यांना तोंड देत सर्वच जेष्ठ आपल्या जीवनाची वाटचाल करीत होते.
या समस्यावर शासकीय पातळीवर सहाय्य व संरक्षण मिळावे म्हणून अनेक ठिकाणी संघटीत होऊन चळवळी सुरू झाल्या.जेष्ठांच्या ठायी असणाऱा प्रदीर्घ अनुभव आणि ज्ञान यांची यथार्थ अशी दखल घेतली ती प्रथम
अमेरिकेतचे अध्यक्ष श्री विल्सन यांनी. त्यांनी सर्वप्रथम १९७१ मध्ये जेष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर
प्रशासकीय पातळीवर विचार करण्यासाठी एक जागतिक परिषद बोलावली.
या परिषदेत बोलताना त्यांनी जेष्ठांबद्दल खूपच भावनिक आणि महत्त्वपूर्ण विचार मांडले. जेष्ठ नागरिक ही प्रत्येक देशाची संपदा आहे. ( Senior citizens are the asset of the nation.) ज्येष्ठांच्या ठायी असलेला प्रदीर्घ अनुभव, सामंजस्य यांचा देशाच्या प्रशासकीय कामात नक्कीच मोलाच्या उपयोग होईल याची जाणीव सर्वांना करून दिली.या ऐतिहासिक परिषदेमुळे ज्येष्ठांच्या प्रश्नांबाबत जगभर जागृती निर्माण झाली.
त्यानंतर १९८२ मध्ये व्हिएन्ना येथे पुन्हा परिषद बोलावण्यात आली.या परिषदेत १२१ राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला.या परिषदेत सदस्य राष्ट्रांनी ज्येष्ठांच्या वाढत्या संख्येचा अग्रक्रमाने विचार करून आपली धोरणे निश्चित करावीत आणि त्याप्रमाणे जेष्ठ नागरिकांच्या क्षमतेला आवाहन करावे असा महत्वाचा प्रस्ताव मांडला व सर्वांनी तो स्विकारला .जेष्ठांचे जे मुख्य प्रश्न आहेत त्यात प्रामुख्याने आरोग्य, संतुलित आहार, ज्येष्ठांच्या सुरक्षा,निवास, सामाजिक कल्याण व सन्मान आणि अर्थाजन या बाबतीत निश्चित धोरण ठरविण्यासाचा उल्लेख व्हिएन्ना येथे ठरविलेल्या प्लॅन ऑफ ॲक्शन मध्ये होता.मानवी हक्क, महिलांचे आरोग्य, आर्थिक सुरक्षा याबाबत अनेक राष्ट्रांना आपली धोरणे तसेच मापदंड निश्चित करण्यासाठी या आराखड्याचा मोठा उपयोग झाला.
ज्येष्ठांच्या करीता चालू असलेली ही चळवळ इथेच न थांबता या बाबत प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी २००२ मध्ये पुन्हा माद्रिद येथे दुसरी जागतिक परिषद घेतली गेली.या परिषदेत १५९ राष्ट्रांनी भाग घेतला.या बैठकीत ज्येष्ठांसाठी नवीन धोरण तयार करण्यात आले.विशेष म्हणजे सहभागी असलेल्या सर्वच राष्ट्रांनी त्यांचा स्वीकार केला आणि त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्याची ग्वाही दिली.याच परिषदेत निश्चित केलेल्या आराखड्यात खालील महत्त्वाच्या मार्गदर्शक तत्वांचा समावेश होता.
१) ज्येष्ठांच्या सामाजिक सुरक्षेचे दायित्व त्यांच्या सरकारचे असून त्यांनी त्यांची अंमलबजावणी करणे.
२) निकोप आरोग्य हा ज्येष्ठांचा मुलभूत हक्क मानून त्याप्रमाणे कार्यवाही करावी.
३) सर्व सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये ज्येष्ठांना अग्रक्रमाने प्रवेश मिळेल अशी व्यवस्था करावी.
४) ज्येष्ठांच्या आपत्कालिन मदतीसाठी युनोने विशेष असे अर्थसंकलन करावे.
५) सामाजिक प्रश्नांत ज्येष्ठांचा समभाग असावा.
६) जेष्ठ असलेल्या महिलांना कुटुंबात मानाचे स्थान असावे.
७) योग आणि अध्यात्माचा अभ्यास व प्रसार ज्येष्ठांच्या स्वास्थ्यासाठी केला जावा.
८) नातवंडांची देखभाल ज्येष्ठांनी करावी त्याचबरोबर कुटुंबाने ज्येष्ठांची काळजी घ्यावी.
९) शासनाने तसेच सामाजिक संघटनांनी या गोष्टी प्रकर्षाने कराव्यात.
१०) ज्येष्ठांच्या कल्याणासाठी राजकीय इच्छाशक्ती निर्माण होऊन राजकीय पक्षांनी आपल्या धोरणपत्रात त्यांचा प्राधान्यक्रमाने स्पष्ट उल्लेख करावा.
या मार्गदर्शक तत्त्वांनुसार जगातील बहुसंख्य देशांमध्ये जेष्ठ नागरिक संघटना कार्यरत झाल्या आणि त्यांनी आपल्या शासनाकडे व समाजापुढे मांडायला सुरुवात केली.असोशिएशन ऑफ रिटायर्ड पर्सन्स नावाची जगातील ज्येष्ठांसाठीची सर्वात मोठी संस्था अमेरिकेत आहे.ही संस्था अविरतपणे कार्यतत्पर असून या संस्थेची सदस्य संख्या तीन कोटींचे वर आहे.
आपल्या भारतातही ज्येष्ठांच्या हित संवर्धनासाठी चळवळ सुरू झाली. देशात बहुतेक शहरात व मोठ्या गावांत जेष्ठ नागरिक संघ स्थापन होऊन कामकाज सुरू झाले. महाराष्ट्रातही डोंबिवली येथे डॉ.राधाकृष्ण भट यांनी १९७७ साली पहिला जेष्ठ नागरिक संघ स्थापन केला.महाराष्ट्रात स्थापन झालेल्या व कार्यरत असलेल्या असंख्य जेष्ठ नागरिक संघामध्ये सुसूत्रता, समानता आणि परस्पर संपर्क होण्यासाठी या सर्व संघाचा एक महासंघ डिसेंबर १९८० मध्ये स्थापन केला आणि त्याला नाव दिले ” आणि फेडरेशन ऑफ सिनियर सिटीझन्स ऑर्गनायझेशन महाराष्ट्र ” ( फेस्काॅम ).या नावाने तो कार्यरत झाला.
या महासंघाने डिसेंबर १९८० मध्ये राज्यातील ज्येष्ठांचे राज्यस्तरीय भव्य अधिवेशनात भरविले होते त्यात प्रामुख्याने जेष्ठांमध्ये जागृती आणि ज्येष्ठांच्या प्रश्नावर चळवळी करण्यासाच्या मुद्यावर भर देण्यात आला. जेष्ठ नागरिक संघाच्या या इवल्याशा रोपट्याचा आता महावृक्ष झाला असून ३००० चे वर संघ स्थापन होऊन प्रभावीपणे कार्यरत आहेत. यापुढे जाऊन आपल्या देशातील सर्व जेष्ठ नागरिक संघांना समन्वय आणि सुसूत्रता आणण्यासाठी तसेच राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करण्यासाठी “ऑल इंडिया सिनीअर सिटीझन्स ऑर्गनायझेशन” नावाची शिखर संघटना स्थापन केली.
राज्यस्तरीय आणि देशपातळीवर असलेल्या या दोन्ही संघटनांनी सतत प्रयत्न करत ज्येष्ठांसाठी बर्याच सवलती मिळवल्या आहेत. ज्येष्ठांना ओळखपत्र देणे, शासकीय दवाखाने हाॅस्पिटल्स, आरोग्य केंद्रात मोफत तपासणी व चिकीत्सा, बॅकांच्या ठेवींवर अर्धा टक्का अधिक व्याज, आयकरात इतरांपेक्षा जास्त सवलत, पोलिस कार्यालयात ज्येष्ठांसाठी हेल्पलाईन, विमानभाड्यात ५० टक्के सवलत, निराधार एकाकी ज्येष्ठांना दरमहा आर्थिक मानधन, एस.टी.प्रवासात ६५ वयाचे वर ५० टक्के तसेच ७५ वयाचे पुढे एस्.टी.प्रवास (महाराष्ट्रात) मोफत केला.त्याचप्रमाणे ज्येष्ठांना विरंगुळा केंद्रासाठी जागा तसेच फर्निचर आणि करमणूक साहित्य हे सर्व स्थानिक प्रशासनाकडून देण्यात येत आहे, याशिवाय सामाजिक, सांस्कृतिक तसेच सार्वजनिक कार्यक्रमात ज्येष्ठांना सहभागी करण्यात येत आहे.याशिवाय करोना साथीचे अगोदर पर्यंत रेल्वे प्रवासात जेष्ठ महिलांना ( वय ५८ ) आणि जेष्ठ पुरुषांना ( वय ६० चे पुढे ) अनुक्रमे ५० आणि ४० टक्के सवलत देण्यात येत होती.रेल्वे प्रवासाची ही सवलत लवकरच पुन्हा सुरू होणार असल्याचे समजले आहे.
तरीपण ज्येष्ठांच्या अजुनही काही न्याय मागण्या राज्य तसेच केंद्र सरकारकडे प्रलंबित आहेत.त्यांचा पाठपुरावा फेस्काॅम आणि आयस्काॅम सातत्याने आणि प्रभावीपणे करीत आहेत.जेष्ठ नागरिक संघटना आता ग्रामीण भागातही कार्यरत झालेल्या सर्वत्र दिसून येत आहेत.
आजही मोठ्या संख्येने जेष्ठ नागरिक निराधार आहेत.अनेक जेष्ठ वयाच्या ८० व्या वर्षातही पोटासाठी कष्ट करीत आहेत.दारिद्र्य रेषेखाली हलाखीचे जीवन जगत असणार्या कुटुंबांची संख्या आजही लक्षणिय आहे.त्यासाठी शासनाने काही प्रभावी उपाय करण्यासाठी शिखर संघटना कार्यरत आहेत.
आज ज्येष्ठांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. ६० वयाच्या पुढील व्यक्ती जेष्ठ नागरिक म्हणून संबोधले जाते. तरीपण ७५ वयापर्यंत बहुतेक जेष्ठ शारिरीक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम आहेत. ज्ञान, अनुभव, कौशल्य आणि चिकाटी जेष्ठांजवळ प्रकर्षाने असल्यामुळे कोणतेही काम ते उत्तम रीतीने करु शकतात.सक्षम असणार्या ज्येष्ठांनी सेवाभावी वृत्तीने राहून समाजासाठी उपयुक्त काम करावे अशी अपेक्षा आहे.विशेषकरुन ग्रामीण भागातील सामान्य जनतेला शासकीय आणि निमशासकीय कार्यालयिन तसेच बॅंकेच्या कामकाजात सहकार्य व मार्गदर्शन करावे.तसेच ही कामे केवळ सेवा म्हणून अत्यंत निस्पृह वृत्तीने करावीत.स्वत:च्या प्रपंचात लक्ष कमी करून सामान्य जनतेच्या अडचणीत त्यांना मदत करता येईल त्यामुळे आपला वेळ सत्कारणी लागेल याशिवाय सतत कामात राहिल्यामुळे आपली प्रकृती निकोप राहण्यास सहाय्यभूत ठरेल.
खरंतर वयाच्या साठीनंतर आपण निवृत्त झालो असे नाही. आपल्या जीवनप्रवासाचे दुसरे पर्व सुरू झाले असी भावना ठेवून खूप काही करता येण्यासारखे आहे. अनेक जेष्ठांकडे विविध कला असतात, छंद असतात. गायन, चित्रकला, नाट्य, खेळ, भजन-प्रवचन यांसारख्या कला, छंदात स्वतःला गुंतवून ठेवावे म्हणजे इतरांनाही आपला सहवास हवासा वाटेल.यामुळे आपला वेळ तर जाईलच याशिवाय अलौकिक अशा आनंदात आपले जीवन प्रवाहीत राहील.
अनेक ज्येष्ठांना वाचनाचा छंद असतो. खरंतर प्रत्येकाने रोज थोडेफार वाचन करावेच त्यामुळे मन प्रसन्न व शांत होते. सर्वच ज्येष्ठांनी निकोप आरोग्याचे संवर्धनासाठी रोज नियमितपणे सकाळ-संध्याकाळी मित्रांबरोबर पायी चालणे, योगा करणे तसेच हास्य क्लब समुहात जाऊन आनंद घेणे यासारख्या उपक्रमात सहभागी व्हावे. ज्येष्ठांच्या जीवन प्रवासातील एक महत्त्वाचे दायित्व म्हणजे नव्या पिढीला संस्कारित करणे. आज शिक्षण क्षेत्र म्हणजे फक्त प्रमाणपत्र देण्याचे कारखाने झाले आहेत. समाजात संपूर्ण पिढी खूप उच्च शिक्षण घेऊन सर्वत्र कार्यरत आहेत. तथापि मोठ्या प्रमाणात त्यांचे व्यवहारी जीवनात योग्य संस्काराचा अभाव दिसून येतो आहे. हे आपण सर्वत्र अनुभवीत आहोत. याकरिता ज्येष्ठांनी दायित्व स्विकारुन किमान आपल्या कुटुंबातील नव्या पिढीला योग्य प्रकारे सुसंस्कारित करावे. सर्वांनीच जर ही बाब महत्त्वाची जबाबदारी म्हणून स्विकारुन त्यासाठी प्रयत्न केले तर आदर्श समाज समृद्धीसाठी मोठा हातभार लागेल.
जेष्ठ नागरिक ही राष्ट्रीय संपदा मानली गेल्यामुळे आपण आपले कर्तव्य यथार्थपणे पार पाडावे आणि समाज व देशकार्यात मोलाचा सहभाग द्यावा.
वृद्धापकाळातील आपला जीवनप्रवास आनंदी व सुखकारक होण्यासाठी प्रवाहित पाण्यासारख सतत गतिमान रहावे म्हणजे कुटुंबासाठी, समाजासाठी तसेच राष्ट्रासाठी बरंच काही केल्याचे समाधान लाभेल आणि मनाला अमर्याद असा कृतार्थतेचा मौलिक आनंद मिळेल…
सर्व जेष्ठांना निकोप दीर्घ आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा….
=================
नारायण शंकर भागवत
निवृत्त प्रशासनाधिकारी, एल्.आय्.सी.ऑफ इंडिया.
नवी सांगवी , पुणे
मोबाईल नंबर-९८८१३०३७३२.
Comments are closed