आत्तापर्यंतच्या इतिहासात 580 कोटींची विक्रमी वसुली!
आता थकबाकीदार रडारवर, जप्ती मोहिमेला होणार सुरूवात
आजपासून दोन टक्के विलंब शुल्क लागू
पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने पालिकेच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात प्रथमच
सहा महिन्यांत विक्रमी अशी कर वसुली केली आहे. सहा महिन्यांत 60 टक्क्यांपेक्षा जास्त करदात्यांकडून तब्बल 580 कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात यश मिळविले आहे. दुसरीकडे वारंवार आवाहन करूनही कर न भरणाऱ्या मालमत्ता धारकांना आजपासून दोन टक्के विलंब शुल्क लागू होणार आहे. तर थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यासाठी तीव्र मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
दरम्यान, गतवर्षी सप्टेंबर अखेरपर्यंत 2 लाख 45 हजार 844 मालमत्ता धारकांनी 364 कोटींचा तर यंदा सप्टेंबर अखेरपर्यंत 3 लाख 66 हजार 636 मालमत्ता धारकांनी 579 कोटी रुपयांचा कर भरला आहे. म्हणजे गतवर्षीपेक्षा 1 लाख 20 हजार 792 मालमत्ता धारकांनी सहा महिन्यांत कराचा भरणा केला आहे.
शहरात निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळ्या जमीन अशा 6 लाख 7 हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत. या मालमत्ता धारकांकडून महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभाग कर वसूल करत आहे. गतवर्षी या विभागाच्या वतीने राबविलेल्या विविध उपक्रम, जनजागृती, जप्ती मोहीम, मालमत्ता धारकांना नोटीसा, नळ कनेक्शन बंद करणे, थकबाकीदारांची वृत्तपत्रात नावांची यादी प्रसिद्ध करणे यासह यंदा महिला बचत गटांच्या माध्यमातून बिलांचे घरपोच वाटप, रिक्षाव्दारे जनजागृती, महत्त्वाच्या चौकात होर्डिंग्ज, रिल्स स्पर्धा, सोशल मीडियाचा प्रभावी वापर याचबरोबर
प्रत्येक व्यक्तीला त्याची मालमत्ता कराची रक्कम आणि सवलतीची रक्कम सांगणारा customised sms पाठवला जात होता. अशा विविध बाबींमुळे 2023-24 च्या पहिल्या सहामाहीत 580 कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात विभागाला यश आले आहे.
6 लाख 7 हजार मालमत्ता धारकांपैकी 3 लाख 66 हजार 636 मालमत्ता धारकांनी म्हणजे 60 टक्के मालमत्ता धारकांनी विविध कर सवलतींचा लाभ घेत सहा महिन्यांत कराचा भरणा केला आहे. या मालमत्ता धारकांनी 579 कोटी 62 लाख 62 हजार रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा केला आहे.
आकडे बोलतात
सहा महिन्यांत वसूल झालेला गेल्या चार वर्षांतील कर संकलनाचा आलेख
वर्ष. करदात्यांची संख्या. रक्कम
2020-21 : 1,64,757: 220 कोटी
2021-22 : 2,23,894 : 280 कोटी
2022-23 : 2,45,844 : 364कोटी
2023-24 : 3,66,636: 579 कोटी
असा आला रूपया
ऑनलाईन – 370 कोटी 83 लाख
विविध ॲप – 5 कोटी 87 लाख
रोख. – 74 कोटी 54 लाख
धनादेशाद्वारे – 57 कोटी 43 लाख
आरटीजीएस – 26 कोटी 46 लाख
इडीसी- 6 कोटी 46 लाख
एनईएफटी – 4 कोटी 54 लाख
डीडी- 3 कोटी 64 लाख
कर भरण्यात निवासी मालमत्ताधारकांची आघाडी
3 लाख 66 हजार 636 मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला आहे. यामध्ये तब्बल 3 लाख 22 हजार 758 निवासी मालमत्ता धारकांनी आपल्या कराचा भरणा केला आहे. त्यानंतर 29 हजार 778 बिगर निवासी, 8 हजार 391 मिश्र, 2 हजार 787 औद्योगिक तर 2 हजार 875 मोकळ्या जमीन असणाऱ्या मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला आहे.
Comments are closed