जेजुरी,दि.१४ :-  आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्या जेजुरी येथील शरदचंद्रजी पवार महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त सहकार्याने माझी माती माझा देश अभियान आणि प्रथम वर्ष कला ,वाणिज्य वर्गाचा विद्यार्थी स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता.


या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे सहसचिव बंडू काका जगताप, प्रमुख पाहुणे पुरंदर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब भिताडे, माजी उपनगराध्यक्ष जयदीप बारभाई, जेजुरी देव संस्थांचे विश्वस्त व माजी विद्यार्थी मंगेश घोणे , प्राचार्य डॉ. बालाजी नाटकरे , माजी सरपंच संभाजी काळाणे , राजेंद्र पेशवे, प्रकाश फाळके, अरुण जोशी, मनोहर ताथवडेकर , उपप्राचार्य डॉ. बेबी कोलते, कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.अरुण कोळेकर ,प्रा.चंद्रशेखर काळे प्रा.किशोरी ताकवले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना बाळासाहेब भिंताडे म्हणाले , महाविद्यालयाने राबविलेला उपक्रम देशाविषयीचे प्रेम आणि विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देणार आहे ,असे सांगून जेजुरी महाविद्यालयाचा समाज बदलासाठी फार मोठा वाटा असल्याचे सांगितले.

 

 

जयदीप बारभाई म्हणाले ,विद्यार्थ्यांनी या वयातच अभ्यास आणि पडेल ते कष्ट करण्याची तयारी ठेवायला हवी .स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील राहा. व्यसनाधीनता व नैराश्य आजच्या तरुण पिढीचे प्रश्न मोबाईलचा आहारी गेल्याने निर्माण झाले आहेत, त्यापासून दूर राहण्याचे आवाहन करून तरुणांनी आरोग्य ही संपत्ती समजून व्यायाम करायला हवा .आजची लोकशाही बळकट करण्याचे काम आपण करायला हवे. तरुणांनी उच्च शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसाय उभा करावा असे सांगितले.


या प्रसंगी मंगेश घोणे म्हणाले , माझ्या आजवरच्या वाटचालीत, यशात महाविद्यालयाचा फार मोठा वाटा आहे ,या महाविद्यालयामुळेच मला विविध पदे चालून आली. होळकर वाड्यात अतिशय प्रतिकूतेतून हे महाविद्यालय चालू झाले पण तिथे शिकलेले माझ्यासारखे अनेक विद्यार्थी समाजाच्या विविध क्षेत्रात यशस्वीपणे काम करतात, याचा आम्हांला अभिमान वाटत असल्याचे सांगितले . आपली स्पर्धा इतरांशी नसून स्वतःशी हवी. माझी जेजुरी देवस्थानवर विश्वस्त म्हणून निवड झाली असली तरी आपण समाजाचे विश्वस्त आहोत, ही भावना ठेवून मी काम करण्याचा प्रयत्न करीन .
अरुण जोशी यांनी ,आयुष्य घडविणाऱ्या आपल्या आई-वडिलांचा आणि शिक्षकांचा सन्मान करायला हवा. या वयातच आयुष्याची दिशा ठरवून वेध घ्यायचा प्रयत्न करा .दिशाहीन न होता दिशादर्शक वाटचाल करा. असं संदेश त्यांनी आपल्या मनोगतातून दिला.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना, संस्थेचे सहसचिव बंडू काका जगताप म्हणाले, महाविद्यालयाने आयोजित केलेले हे देशभक्तीचे अभियान विद्यार्थ्यांच्या मनात मातीवरील आणि देशावरील निष्ठा निर्माण करणारे ठरेल. महाविद्यालयीन शिक्षणातूनच आपल्या मनात राष्ट्रप्रेम आणि समाजावरील प्रेम निर्माण होऊ शकते .उद्याचा सुजाण नागरिक घडविण्यासाठी आणि सुप्त गुणांचा विकास होण्यासाठी असे उपक्रम निश्चित मदत करतात , असे सांगून विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमात सहभागी होण्यासाठी आवाहन केले .


विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ प्रसंगी आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या रंगमंचाचे उद्घाटन जेजुरी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक रूपाली पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना सायबर क्राईम विषयी माहिती देऊन मुलींनी निर्भय बनायला हवे असे आवाहन करून विद्यार्थ्यांनी एक जबाबदार नागरिक म्हणून आपले वर्तन ठेवायला हवे अशा प्रकारचे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. चंद्रशेखर काळे यांनी केले.आलेल्या मान्यवरांचे स्वागत व मनोगत प्राचार्य डॉ. बालाजी नाटकरे यांनी‌ व्यक्त केले. पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य डॉ.बेबी कोलते यांनी करून दिला. आभार प्रा. गौरी फडतरे यांनी तर सूत्रसंचालन प्रा. किशोरी ताकवले यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. पुजा तावरे प्रा. गौरी फडतरे, प्रा.पूनम कुदळे यांनी केले. कार्यक्रमासाठी ग्रामस्थ ,विद्यार्थी ,शिक्षक, शिक्षकेतर सेवक बहुसंख्येने उपस्थित होते.अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा.डॉ.अरुण कोळेकर यांनी दिली.

 


 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!