पुणे,दि.१७ :- देहूरोड – चिंचोली, पुणे येथे एका अज्ञात इसमाने जवळ जवळ 8 ते 9 फुट लांबीच्या बिनविषारी भारतीय अजगर जातीच्या सापाला नायलोनच्या एका जाड रश्शीने घट्ट बांधून ठेवले आहे अशी माहिती काही स्थानिकांनी स्केल्स अँड टेल्स वाईल्डलाइफ ऍनिमल रेस्क्यू फाउंडेशन,पुणे ह्या संस्थेतील सदस्य ओंकार बालघरे ह्यांना दिली. संस्थेतील सदस्य घटनास्थळी पोहोचल्यावर अजगराला बांधलेल्या अवस्थेतून लगेच सोडवण्यात आले.
अजगरास बराच वेळ घट्ट आवळून बांधल्यामुळे त्याची हालचाल पूर्णपणे बंद झाली होती आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ उचारासाठी पुणे येथील रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट येथे ऍडमिट करण्यात आले. उपचारानंतर अजगराची पुन्हा तपासणी करून अजगर नैसर्गिक वातावरणात मुक्त करण्यासाठी आता पूर्णपणे तयार असल्याची खात्री करून मुक्त करण्यात आले.
अज्ञानामुळे किंवा भीतीपोटी माणूस असे पाऊल उचलतो पण आज आपण ज्या ठिकाणी घरे बांधलीत त्या ठिकाणी सुद्धा काही वर्षांपुर्वी जंगल होते हे आपन समजून घेतले पाहिजे. आज शहरीकरण आणि इतर विकासाच्या गोष्टींमुळे जंगल,झाडे,शेती नामशेष होत चालले आहे आणि त्यात अजगरासारख्या सरपटणाऱ्या प्राण्याला अशा गोष्टींना बळी पडावे लागत असेल तर आपला अंत आपण स्वतःहून ओढवून घेत आहोत.
भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार भारतीय अजगराची नोंद ही schedule – 1 मध्ये आहे आणि संरक्षित वन्यजीव (प्रजाती) असल्यामुळे भारतीय अजगर सापाला मारणे, डांबून ठेवणे, तस्करी करणे ह्या सारखे कृत्य केल्यास वनविभागातर्फे गंभीर गुन्हा दाखल होऊन शिक्षा होऊ शकते.
साप किंवा इतर वन्यप्राणी/पक्षी जखमी किंवा त्यांची वाट चुकून शहरी भागात आढळल्यास 1926 ह्या क्रमांकावर संपर्क करून वनविभागाला घटनेची माहिती द्यावी किंवा 7276882656 ह्या क्रमांकावर संपर्क करून स्केल्स अँड टेल्स वाइल्डलाईफ ऍनिमल रेस्क्यू फाउंडेशन,पुणे ह्या संस्थेला घटनेची माहिती द्यावी.
Comments are closed