पुणे दि.३०( punetoday9news):- कोरोनाचा रुग्ण दर व मृत्यु दर कमी करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोरोना नियंत्रणासाठी लोकप्रतिनिधींनी शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून भूमिका बजावावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
राज्यात व्हेंटिलेटर, पी पी ई किट, एन ९५ मास्क पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून गरजेनुसार त्या-त्या भागात पुरवठा करण्यात येत आहे. महापालिकांना कोरोना प्रतिबंधाच्या अनुषंगाने आर्थिक मदत देण्यात आली असून यापुढे ही मदत देण्यात येईल, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यात प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स बनविण्याच्या सूचना दिल्या असून त्यानुसार टास्क फोर्स निर्माण होत आहेत. यामुळे कोरोना उपाययोजनामध्ये सुसुत्रता येईल.

कोरोना रुग्ण संख्येच्या परिस्थितीनुसार लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात येत आहेत. तथापि, प्रतिबंधित क्षेत्रात नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे.  खाजगी प्रयोगशाळांनी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांना परस्पर तपासणी अहवाल न देता संबंधित महापालिका यंत्रणेला द्यावा, जेणेकरुन रुग्णांना वेळेत बेड उपलब्ध होईल. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर व पुणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग यामध्ये एकसुत्रीपणा आणून सर्वांनी मिळून काम करावे, असे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, पुण्यात उभारण्यात येणाऱ्या जम्बो रुग्णालयाचे काम गतीने करावे. संगणकीय प्रणालीमध्ये बेड व्यवस्थापन व अन्य आवश्यक माहिती अद्ययावत ठेवावी. तसेच याचा आढावा वेळोवेळी वरिष्ठ प्रशासकीय यंत्रणेने घ्यावा. झोपडपट्टी परिसरात छोटी घरे असल्यामुळे याठिकाणी गृह अलगीकरणापेक्षा संस्थात्मक अलगीकरणांवर भर द्यावा. ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू होवू नये यासाठी ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिका तयार ठेवाव्यात. उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी कोरोना परिस्थिती नियंत्रणासाठी दर आठवड्याला पुण्यात प्रशासकीय यंत्रणेसोबत बैठका घेवून आढावा घेत असल्याचे सांगितले. ससून रुग्णालयात तपासणी क्षमता वाढवावी अशा सूचना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केल्या. महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी पिंपरीतील शासकीय रुग्णालयामध्ये चांगल्या सुविधा मिळत असल्याच्या प्रतिक्रिया रुग्णांकडून आल्याचे सांगितले.

 

Comments are closed

error: Content is protected !!