पुणे, दि.२१:- राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सोमवार २० नोव्हेंबरपासून संयुक्त कुष्ठरोग शोध अभियान आणि सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिमेला सुरुवात करण्यात आली. हे अभियान ६ डिसेंबरपर्यंत राबविण्यात येणार असून अधिकाधिक नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा आणि आपल्या घरातील, तसेच परिसरातील संशयित कुष्ठरुग्ण आणि क्षयरुग्णांची माहिती आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना देऊन या विशेष अभियानाला सहकार्य करावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
अभियानांतर्गत शहरी व ग्रामीण भागात शोधलेला एकही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आरोग्य विभागामार्फत घेण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार या संयुक्त अभियानाची आखणी आणि नियोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत घरोघर सर्वेक्षणाद्वारे समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण आणि सक्रिय क्षयरुग्ण शोधून त्यांना त्वरित औषधोपचाराखाली आणण्यात येणार आहे.
संयुक्त कुष्ठरोग व सक्रिय क्षयरोग शोध मोहिमेसाठी आरोग्य विभागाने राज्यभरात ६५ हजार ८३३ पथके तयार केली आहेत. एक पथक एका दिवसात शहरी भागातील २५ आणि ग्रामीण भागातील २० घरांना भेटी देणार आहे. गृहभेटी अंतर्गत राज्यातील १ कोटी ७५ लाख घरांचे सर्वेक्षण केले जाणार असून, अंदाजे ८ कोटी ६६ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले जाणार आहे.
गेल्या ५ वर्षापासून राज्यात दरवर्षी कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येते. या अभियानात १०० टक्के ग्रामीण लोकसंख्येची व साधारणतः २० टक्के शहरी लोकसंख्येची एक आशा सेविका व एक पुरुष स्वयंसेवकाच्या पथकाद्वारे प्रत्यक्ष शारीरिक तपासणी करुन संशयित लक्षणे असलेले रुग्ण शोधून काढले जाणार आहेत. या संशयितांची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करुन कुष्ठरोगाचे निदान झालेल्या कुष्ठरुग्णांवर बहुविध औषधोपचार करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय क्षयरोग दूरिकरण कार्यक्रमांतर्गत २०१७-१८ पासून राज्यात दरवर्षी जोखमीच्या भागामध्ये सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येते. या मोहेमेंतर्गत घरोघरी सर्वेक्षण करून क्षयरोगाचे निदान झालेल्या रुग्णांवर मोफत औषधोपचार करण्यात येणार आहेत.
नागरिकांनी आरोग्य विभागाच्या या विशेष अभियानाला सहकार्य करावे आणि कुष्ठरोग व क्षयरोगाच्या समूळ निर्मूलनासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहनही सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments are closed