पिंपरी दि. ३०( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे. अशातच चिंचवडच्या मोहननगर येथील ईएसआयसी हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांच्या जेवणात  माश्या व आळ्या आढळून आल्या असल्याच्या तक्रारी रूग्णांनी केल्याने या प्रकरणाची दखल घेत, पिंपरी चिंचवड शहर मनसे अध्यक्ष तथा महापालिकेचे गटनेते सचिन चिखले यांच्यासह राजु सावळे, बाळा दानवले, मयुर चिंचवडे, दत्ता देवतरासे या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने थेट मोहननगरच्या ईएसआय रुग्णालयास भेट देऊन डॉक्टर व अधिकारी  यांना परिस्थिती सुधारण्यासाठी इशारा दिला आहे. 

पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, कोविड रुग्णांवर महापालिकेसह खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. महापालिका कोविड रुग्णांसाठी लाखो रुपयांचा खर्च करत आहे. परंतु, प्रत्यक्षात रुग्णांना मात्र योग्य ती सेवा मिळत नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने काही रुग्णालये कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी निवडलेली आहेत. त्यातीलच एक मोहननगर ईएसआयसी हॉस्पिटल. या रुग्णालयात रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जा निकृष्ट आहे. या हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या जेवणात माश्या व आळ्या आढळून येत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

रुग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जा तात्काळ सुधारण्यात यावा; अन्यथा जेवणाचा त्याग करण्यात येईल, असा इशारा कोरोनाग्रस्त रुग्णांनी या रुग्णालयास दिलेला असताना देखील रुग्णालय प्रशासन ताळ्यावर येत नाही. हे अन्नपदार्थ खाल्याने येथील रुग्णांना पोटदुखी, ॲसिडिटी, जुलाब यासारखे त्रास होत आहेत. वारंवार तक्रार करूनही निकृष्ट जेवण पुरवण्यात येत असेल तर संबंधित अधिकाऱ्यावर व ठेकेदारावर त्वरीत कारवाई करण्यास प्रशासनाचे हात धजावतात नाहीत का? प्रशासनाने वेळीच यावर रोख लावावा व कोरोना रुग्णांना चांगल्या दर्जाचे जेवण पुरवण्याची व्यवस्था करावी. यापुढे देखील शहर मनसेचे शिष्टमंडळ शहरातील प्रत्येक कोविड केअर सेंटरला भेटी देणार आहे. कुसूर झाल्यास मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल, असे या पत्रकात चिखले यांनी म्हटले आहे.

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!