सांगवी,दि.२६ :- श्री दत्तआश्रम सांगवी तर्फे श्री दत्त जयंती संगीत महोत्सव अतिशय उत्साहाने साजरा केला गेला. श्री तुकारामभाऊ आणि त्यांच्या
सहका-यांच्या संकल्पनेतून आणि अथक प्रयत्नांतून गेली 35 ते 40 वर्षे हा स्वरानंद सोहळा अखंड चालत राहिला आहे.
या महोत्सवाची सुरेल सांगता पंडिता सौ मंजिरी आलेगांवकर यांच्या सुश्राव्य गायनाने झाली.
मंजिरीताईंनी सुरवातीला राग हंसध्वनी मधील ईशस्तुतीपर काही रचना आणि तराणा सादर केला आणि श्रोत्यांची वाहवा मिळवली. त्यानंतर प. पू. सद्गुरू श्री शिरीषदादा कवडे यांची ” माझे जीवपण फिटावे केशवा ” ही रचना अतिशय तन्मयतेने सादर केली. त्यानंतर संत कबीरांच्या निर्गुणी भजनांच्या गायनाने मंजिरीताईंच्या मैफीलीने एक वेगळीच उंची गाठली. रसिक श्रोत्यांच्या आग्रहास्तव मंजिरीताईंनी सर्वात्मका सर्वेश्वरा हे पद गाऊन आपल्या उत्तरोत्तर चढत गेलेल्या मैफिलीची सांगता केली आणि रसिक श्रोते त्या स्वरानंदात न्हाऊन निघाले.
मंजिरीताईंना तबल्याची उत्तम आणि संयत साथ श्री अजित किंबहुने यांनी आणि संवादिनीचीही उत्तम आणि योग्य अशी साथ श्री हिमांशु जोशी यांनी केली.
तानपुरा आणि स्वरसाथ मंजिरीताईंच्या शिष्या कीर्ति कुमठेकर, डॉ मृणाल वर्णेकर, विजेता हेगडे आणि स्वराली आलेगांवकर यांनी केली आणि कार्यक्रमात अधिक रंगत आणली.
Comments are closed