पुणे, दि. ४ :-  केंद्र शासनाच्या जनकल्याणकारी योजना घरोघरी पोहोचविण्यासाठी पुणे शहरात ‘विकसित भारत संकल्प’ यात्रेचे आयोजन करण्यात येत असून आतापर्यंत शहरातील ५६ हजार ६३८ नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घेतला आहे.

पुणे शहरात २८ नोव्हेंबर २०२३ पासून विविध ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. यात्रेच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधून विविध योजनांचा लाभ देण्यासाठी लाभार्थ्यांची नोंदणीदेखील करून घेण्यात येत आहे. यात्रेत एकूण १ लाख ४७ हजार ४०८ नागरिकांनी सहभाग घेतला. ९ हजार ७९९ नागरिकांनी आधार कार्ड नोंदणीचा लाभ घेतला. २१ हजार ६३३ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली, तर ८ हजार २८० नागरिकांची आयुष्मान भारत कार्डसाठी नोंदणी करण्यात आली.

यात्रेदरम्यान ११ हजार १८४ नागरिकांनी उज्वला गॅस योजना तर ५ हजार ७४२ नागरिकांनी पंतप्रधान स्वनिधी योजनेचा लाभ घेतला. १० हजार ६०७ नागरिकांनी आत्मनिर्भर भारतासाठी सामुहिक शपथ घेतली. विकसित भारत संकल्प यात्रेत केंद्र शासनाच्या विविध योजनांचे स्टॉल लावण्यात येत असून नागरिकांना योजनांची माहिती देणारी पुस्तिकाही देण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, तृतीयपंथी, विद्यार्थी आदी यात्रेत सहभागी होत आहेत. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून गरजू नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.

विकसित भारत संकल्प यात्रा पुणे शहरात २६ जानेवारी पर्यंत सुरू राहणार आहे. ५ डिसेंबर रोजी शहरातील संतोष नगर कात्रज चौक, कात्रज बस स्टॉप भाजी मंडई, गोखले नगर शाळेचे मैदान, शिवाजी हाऊसिंग सोसायटी, वैदू वाडी, बहिरट वाडी या भागात तर ६ डिसेंबर रोजी गोळवलकर गुरुजी शाळा औंध गावठाण, औंध गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, श्रीराम चौक हांडेवाडी रोड, ससाणे चौक ससाणे नगर या भागात यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी यात्रेमध्ये सहभागी होऊन केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

 


 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!