२६ वे आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलनात परिसंवादाचे आयोजन .
सासवड,दि.१२ : – साहित्य आणि भाषेविषयीची उदासीनता सर्वदूर आणि सार्वत्रिक झाली असून ती चिंताजनक बाब आहे. भाषेमुळे नोकरी मिळत नाही असे एक समीकरण तयार केले गेले आहे .कन्नड आणि तेलुगु भाषिकांना जसा त्यांच्या भाषेचा अभिमान आहे तसा तो मराठी भाषिकांमध्ये आढळून येत नाही .ही गोष्ट स्वागतशील नाही. भाषा केवळ व्यवहारापुरती नसते तर ती सांस्कृतिक जीवनाचा भाग असते. समाजाची म्हणून एक सांस्कृतिक पार्श्वभूमी असते. ती भाषेवर उभी असते .कोणतीही भाषा कधीच संपत नाही. मराठी सुद्धा कधी संपणार नाही. आपण सगळे इंग्रजीच्या अधीन झाल्यामुळे भारतीय भाषांविषयीची चिंता वाढली आहे, असे प्रतिपादन प्रा.डाॅ.अविनाश आवलगावकर यांनी केले.
सासवड येथे आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, महाराष्ट्र साहित्य परिषद ,सासवड शाखा आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त सहकार्याने २६वे आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनात मराठी आणि भारतीय भाषा : एक अनुबंध या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते .त्याप्रसंगी व्यासपीठावर डॉ. अविनाश आवलगावकर परीसंवादाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. त्यावेळी प्रा.डॉ. गोरख थोरात,प्रा. डॉ. संजय कोळी, संस्थेचे अध्यक्ष विजय कोलते, स्वागताध्यक्ष बाळासाहेब भिताडे, शांताराम पोमण ,वसंतराव ताकवले, बंडूकाका जगताप, परिसंवादाचे संयोजक प्रा. डॉ. अरुण कोळेकर उपस्थित होते.
मराठी आणि हिंदी भाषेतील अनुबंध उलगडून सांगताना प्रा. डॉ.गोरख थोरात म्हणाले, हिंदी आणि मराठी भाषेच्या ऋणानुबंधाचे अनेक दाखले सापडतात. मराठी भाषेची हिंदी ही भाषाभगिनी आहे. मराठीच्या अनेक साहित्यकृतीचे हिंदी भाषेत अनुवाद झाले आहेत. चंद्रकांत पाटील, नामदेव ढसाळ ,दया पवार, लक्ष्मण गायकवाड ,भालचंद्र नेमाडे, इ.चे साहित्य हिंदी भाषेत अनुवादित केले आहे परंतु हिंदी ने किती मराठीतील साहित्य अनुवादित केले आहे ?असा प्रश्न उपस्थित होतो. मराठीमुळे दलित साहित्य चळवळ हिंदीत पोहोचली. मराठीतील लावणी काव्य प्रकार हिंदीने स्वीकारला. मराठीतील अनेक कलावंतांनी हिंदी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत .मराठी माणूस हिंदीसाठी खूप प्रयत्नशील दिसतो आहे पण हिंदी माणूस मराठीसाठी प्रयत्नशील नसल्याची खंत डॉ. थोरात यांनी बोलून दाखवली.
डॉ.संजय कोळी यांनी मराठी व कन्नड भाषेचे परस्पर संबंध स्पष्ट केले. मराठी आणि कन्नड भाषेतील शब्दांत कितीतरी साम्य असल्याचे त्यांनी उदाहरणासह स्पष्ट केले . मराठी संतांनी तर विठ्ठलाचे कानडीपण वारंवार आळविले आहे.नाकारलेल्या लोकांनी लिहिलेले काव्य अळवार साहित्याचा सापडते .भाषा आणि संस्कृतीचे जतन ,हस्तांतर करताना ते काळजीपूर्वक करण्याची आवश्यकता असते .मराठी आणि दक्षिण भारतातील भाषांचा एक परस्पर संबंध असल्याचे दिसून येते, असे ते म्हणाले.
परिसंवादाच्या आयोजनामागील भूमिका प्रास्ताविकाच्या रूपाने प्रा. डॉ.अरुण कोळेकर यांनी स्पष्ट केली. उपस्थितांचे स्वागत शांताराम पोमण यांनी केले . विजय कोलते यांनी आभार मानले.
Comments are closed