सासवड,दि.१३:- ‌”काही वर्षांनी कुणी म्हणेल
पूर्वी इथे शेती करणारे लोक राहायचे
निराशेची वावर नांगरून
भयंकर काबाडकष्टाने आणि धान्य पिकवायचे
आम्ही सतत त्यांना मातीत घातलं म्हणून
नाहीतर आज तर त्यांचं राज्य असतं “
ही शेतकऱ्यांची अवस्था अधोरेखित करणारी कविता कल्पना दुधाळ यांनी सादर केली.
निमित्त होते आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, सासवड , महाराष्ट्र साहित्य परिषद ,सासवड शाखा आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित केलेल्या २६ वे आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलनात क-हेकाठी सायंकाळी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.


त्याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष विजय कोलते, अण्णासाहेब खाडे, शांताराम पोमण , बंडूकाका जगताप, प्रा.डॉ. अरुण कोळेकर, वसंतराव ताकवले ,जगदीश शेवते, बाळासाहेब मुळीक, शिवाजी घोगरे ,कुंडलिक मेमाणे आदी मान्यवर उपस्थित होते .
कवी संमेलनासाठी कल्पना दुधाळ, बाळासाहेब लबडे, बाळकृष्ण लळित, प्रवीण जाधव, नितीन मोटे, शुभांगी जाधव, राजेंद्र सोनवणे, विरजा जाधव, शरद पाडसे यांनी आपल्या सामाजिक, प्रेम विषयक, राजकीय ,स्त्री जाणिवेच्या आणि निसर्ग विषयक काव्यरचना सादर करून कवी संमेलनात रंग भरले.
राजेंद्र सोनवणे यांनी सादर केलेल्या
हे माणूस मारणारी धर्म कोणते रे
प्रेमावरी इथे ही पृथ्वी जिवंत आहे
या काव्यओळींना रसिकांनी भरभरून दाद दिली.
पाचट कवितेतून नितीन मोटे यांनी ऊसतोड कामगारांचे अस्वस्थ करणारी जीवन विषयक वास्तव उभे केले.
तर बाळासाहेब लबडे यांनी
गब्बर शिवाय सरकारला कुणाचा धाक नाही
त्येचो शिवाय डिझेलचा भाव कमी होत नाय
ही राजकीय खारवी बोलीतील कविता सादर केली. बाळकृष्ण लळित यांनी स्त्रियांचे दुःख मांडणारी कविता सादर केली .प्रवीण जाधव यांनी बापाचे चित्रण करणारी कविता गायली.
शुभांगी जाधव यांनी इतरांच्या सुखासाठी स्वहित हरवलं
गाव ओलांडताना अंतर कसं वाढलं , अखेरचे हे गाव माझं आलं
ही गावाविषयीची संवेदना व्यक्त करणारी कविता सादर केली .
विरजा जाधव यांनी गर्द हिरव्या वस्त्रात गुदमरलेला देह…
साधका सांग ना ….सुटेल का रे मोह ?
असा प्रश्न विचारणारी कविता सादर केली.
कवी संमेलनाचे रंगत वाढविणारे सूत्रसंचालन व‌ संयोजन कवी दशरथ यादव यांनी केले. विजय कोलते यांनी कवींचे स्वागत केले. बाळासाहेब मुळीक यांनी कवींचे व रसिकांचे आभार मानले. संमेलन यशस्वी करण्यासाठी विजय कोलते ,अण्णासाहेब खाडे, शांताराम पोमण, बंडूकाका जगताप, वसंत ताकवले,प्रा. डॉ. अरुण कोळेकर , डॉ.बालाजी नाटकरे ,अक्षय पवार ,शहाजी पवार ,अनिकेत जगताप ,शांताराम कोलते, शिवाजी घोगरे, दिलीप निरगुडे , श्याम पवार, मंगेश नारगे इ.मंडळींनी परिश्रम घेतले.

 


 

 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!