नाव न घेता अजित पवारांनी केलं योगी आदित्यनाथ यांच्या विधानाचं खंडन.

  • आपली सामाजिक विचारधारा कायम असल्याचा संदेश देत अजित पवारांची मांडणी 
  • शिवजयंतीनिमित्त महाराष्ट्रभर राष्ट्रवादी साजरा करणार स्वराज्य सप्ताह
  • शिवरायांच्या रयतेचं राज्य या संकल्पनेवर आपल्या पक्षाची वाटचाल करणार  
  • कार्यकर्त्याना दिली सामाजिक जबाबदारीची स्वराज्य शपथ 

मुंबई, दि. १३:-  राजमाता जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांना घडविले, त्याच शिवरायांच्या गुरु आणि मार्गदर्शक होत्या ,त्यांनी महाराजांना प्रेरणा दिली. याच प्रेरणेतून स्वराज्य स्थापन करायचे या धेय्याने शिवरायांनी मावळ्यांचे सैन्य उभे करुन स्वराज्याची उभारणी केली, हा इतिहास आहे. याच इतिहासातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्र प्रेरणा घेतो, अशी ठाम भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी मांडली.  राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातर्फे येत्या शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित ‘स्वराज्य सप्ताहा’ कार्यक्रमाच्याच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

शिवजयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतिने १२ ते १८ फेब्रुवारी दरम्यान स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे, या कार्यक्रमाचा शुभारंभ सोमवारी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल ,प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, खासदार प्रफुल पटेल, मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, मंत्री धर्मरावबाबा अत्राम, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पक्षाचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ, आदी उपस्थित होते. 

रविवारी आळंदी येथे गीता-भक्ती अमृतमोहत्सव सोहळ्याला उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगीआदित्यनाथ उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडविण्याचे काम केले, असे विधान केले होते . त्यानंतर आज अजित पवार यांनी स्वराज्य सप्ताहनिमित्त आयोजित कार्यक्रमात जिजाऊंनी शिवाजी महाराजांची जडणघडण केली असे ठामपणे सांगत योगींच्या विधानाचे अप्रत्यक्षपणे खंडण केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने  कायमच शिवाजी महाराजांच्या ‘रयतेचे राज्य’ या संकल्पनेतून प्रेरणा घेतली असे, सांगत आपण बहुजनवादी विचारधारे सोबत कायम असल्याचे संकेत अजित पवार यांनी यावेळी दिले. या मेळाव्यात योगी आदित्यनाथ यांच्या विधानाचे अप्रत्यक्ष खंडन करून अजित पवार यांनी लाल महाल मधील दादोजी कोंडदेव यांच्या पुतळ्याच्या वादापासून त्यांनी घेतलेली भूमिका भाजपसोबत राजकीय युतीत गेल्यानंतरही कायम असल्याचे दाखवून दिले आहे. 

यापूर्वीही अजित पवार यांनी महायुतीत येण्याअगोदर छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते ही भूमिका मांडली होती , त्यामुळे शिवरायांच्या इतिहासबद्दलची आपली सामाजिक भूमिका ठाम आहे हे आज स्वराज्य सप्ताहानिमित्त आज अजित पवार यांनी योगी आदित्यनाथ यांच्या मताचे अप्रत्यक्षरित्या खंडन करून ती बाब अधोरेखित केली 

शेतकरी हा शिवाजी महाराजांनी त्यांच्या प्रशासनाचा केंद्रबिंदू मानला, म्हणून म. फुले यांनी त्यांना कुळवाडीभूषण म्हटले, महिलांचे रक्षण हे राजसत्तेचे काम आहे, शिवरायांचे राज्य हे लोककल्याणकारी राज्य होते, त्यांच्या राज्यात धर्म, जात, वर्ग याला थारा नव्हता, असे मत या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडले. 

आता योगीआदित्यनाथ यांनी समर्थ आणि शिवरायांच्याबाबतीत केलेल्या विधानानंतर अजित पवार यांनी आपली भूमिका मांडताना शिवरायांनी अठरापडगड जातींना सोबत घेऊन ते समतेचा संदेश देणारे राजा होते , शेतकऱ्यांच कल्याण करणारे राजा होते, लोककल्याण ही शिवरायांची राज्यनीती होती हे अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले .

 

राष्ट्रवादीच्या स्वराज्य सप्ताह अंतर्गत होणार उपक्रम 

  • जिल्ह्याजिल्ह्यात स्वराज्य पताका, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, गडकोट स्वच्छता मोहीम, निबंध, वत्कृत्व, रॅप सॉंग, रील, पोवाडे स्पर्धा , शिवकालीन शस्त्र, वस्तू, फोटो प्रदर्शन, व्याख्यान आणि पोवाडे स्पर्धा हे उपक्रम राष्ट्रवादी पक्षातर्फे महाराष्ट्रभर घेण्यात येणार आहेत. 

 

कार्यकर्त्यांना सामाजिक जबाबदारीची स्वराज्य शपथ 

यावेळी स्वराज्य सप्ताहानिमित्त अजितदादांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्वराज्य शपथ देताना कायद्याचे पालन करणे, स्त्रियांचा आदर करणे, पर्यावरणाची काळजी घेणे आणि व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन करत सामाजिक जबाबदारीची जाणीव करुन दिली, आपल्या पक्षाच्या वाटचालीत कार्यकर्त्याचे आचरण कसे हवे, यांची त्यांनी कार्यकर्त्याना जाणीव करून दिली.  

 


 

 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!