आज क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचा स्मृतीदिन.समाजातील अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी आयुष्यभर जळत राहिलेली ही ज्ञानज्योती आजच्याच दिवशी म्हणजे 10 मार्च 1897 रोजी मालवली.सावित्रीमाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला. महात्मा जोतिराव फुले आणि ज्ञानज्योती,क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी समाजाची उन्नती व्हावी,विकास व्हावा म्हणून हयातभर आपला देह झिजवला.’मुलगी शिकली,की धर्म बुडतो.मुलगी शिकली, की अक्षराच्या आळ्या होतात आणि घरचे लोक जेवायला बसले, की त्यांच्या ताटात जातात.’ असे धर्माचे नियम असताना महात्मा फुलेंनी 1 जानेवारी 1848 रोजी देशातली मुलींची पहिली शाळा काढली.महात्मा फुलेंनी सुरू केलेल्या शाळेतील मुलींची संख्या हळूहळू वाढायला लागली त्यामुळे महात्मा फुलेंनी काही शिक्षकांची नेमणूक केली पण पुण्यातील कर्मटांनी त्या शिक्षकांना समाज बहिष्कृत करण्याची भीती दाखवल्यामुळे एकही शिक्षक शाळेत टिकत नव्हता.महात्मा फुले केवळ बोलघेवडे समाजसुधारक नव्हते तर कर्ते सुधारक होते.त्यांनी समाज सुधारणेची सुरुवात स्वतःच्या घरापासून केली.
त्यांनी आपल्या पत्नीला,सावित्रीमाईंना सर्वप्रथम शिकवलं. सावित्रीमाई सुद्धा शिकल्या.साक्षर झाल्या आणि देशातील पहिल्या महिला शिक्षिका झाल्या.महात्मा फुले जितके कणखर होते तितक्याच खंडोजी नेवसे पाटलांची कन्या आणि महात्मा फुले यांच्या अर्धांगिनी असणाऱ्या सावित्रीमाई सुद्धा कणखर होत्या. मुलींना शिकवण्याचं कार्य फुले दांपत्याने सुरू केलं आणि पुण्यातील कर्मठ लोकांमध्ये एकच हल्लकल्लोळ माजला. या कर्मठ लोकांनी महात्मा फुलेंचे वडील गोविंदराव फुले यांना समाज बहिष्कृत करण्याची भीती घालून जोतिराव फुले यांचे कार्य थांबवण्याचा प्रयत्न केला.धर्ममार्तंडाच्या धमकीला घाबरून गोविंदराव फुले महात्मा फुले यांना म्हणाले “मुलींना शिकवण्याचा तुझा हा उद्योग बंद कर नाहीतर माझ्या घरातून निघून जा.”त्यावेळेस महात्मा फुलेंनी घराचा त्याग केला पण आपण सुरू केलेले स्त्री शिक्षणाचे कार्य सोडलं नाही. महात्मा फुले यांनी घराचा त्याग केला त्यावेळेस सावित्रीमाई सुद्धा महात्मा फुले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या.सावित्रीमाई रोज शाळेत मुलींना शिकवायला जायच्या आणि पुण्यातील कर्मठ लोकांचा त्यांना प्रचंड त्रास व्हायचा. अंगावरती चिखल,शेणाची गोळे सनातनी लोक फेकायचे. एके दिवशी सावित्रीमाई महात्मा फुलेंना म्हणाल्या,”शेटजी शाळेत जाताना हे कर्मठ लोक माझ्या अंगावरती चिखल शेण फेकतात.त्या शेणा-चिखलाचा वास दिवसभर नको नकोसा होतो.मुलींना शिकवण्यात मन लागत नाही.काय व करावं? ” त्यावेळेस महात्मा फुले म्हणाले,”सावित्री जाताना पिशवीत अजून एक साडी घेऊन जात जा आणि शाळेत गेल्यावर घाण झालेली साडी बदलत जा.”गोरगरिबांच्या आणि मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी प्रचंड त्रास सहन केला पण शिक्षणाचा मार्ग सोडला नाही. सावित्रीमाई महात्मा फुले यांच्या मार्गदर्शनाखाली त्या नुसत्या शिकल्याच नाहीत तर उत्तम कवयित्री सुद्धा झाल्या.’काव्यफुले’ व ‘बावन्नकशी सुबोध रत्नाकर’ हे दोन काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. महात्मा फुलेंनी छत्रपती शिवरायांचा विचार समाजात रुजावा यासाठी शिवजयंती उत्सवाची सुरुवात केली. शिवरायांचा 908 ओळींचा पोवाडा लिहिला.त्याचप्रमाणे सावित्रीमाईसुद्धा शिवरायांचं मोठेपण सांगताना आपल्या ‘काव्यफुले’ या काव्यसंग्रहातील पाचव्या कवितेत लिहितात,
“छत्रपती शिवाजीचे l
प्रातःस्मरण करावे ll
शूद्रादि अतिशुद्रांचा l
प्रभू वंदू मनोभावे ll”
लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगताना सावित्रीमाई आपल्या कवितेतून लिहितात.
“ज्ञान नाही विद्या नाही l
ते घेण्याची गोडी नाही ll
बुद्धी असूनि चालवत नाही l
तयास मानव म्हणावे का ll”
शिक्षणाची आवड नसणाऱ्या लोकांना वरील शब्दात त्यांनी फटकारलं. शिक्षणाशिवाय आपली प्रगती होऊ शकणार नाही.ही सावित्रीमाईंची तळमळ होती.म्हणूनच त्यांनी लोकांना शिक्षित होण्याचा संदेश दिला.
सावित्रीमाईंनी त्या काळात इंग्रजी भाषेचे महत्त्व ओळखलं होतं. इंग्रजी भाषा आत्मसात करा हे सांगताना त्या आपल्या कवितेत लिहितात,
“इंग्रजी माऊली l
इंग्रजी वैखरी ll
शूद्रांना उद्धारी l
मनोभावे ll
इंग्रजी माऊली l
तोडते पशुत्व ll
देते मनुष्यत्व l
मानवास ll “
आज जगाच्या स्पर्धेत टिकायचा असेल तर इंग्रजीला पर्याय नाही असा आपण म्हणतो. सावित्रीमाईंनी तर एकोणिसाव्या शतकात हे ओळखलं होतं.आपले पती महात्मा फुले समाजातील कर्मठ लोकांच्या विरोधाला न जुमानता शूद्रादि अतिशूद्रांच्या उन्नतीच काम करतायेत हे सावित्रीमाईंना माहीत होतं,म्हणून त्या त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. महात्मा फुले समाजात क्रांतिकारी कार्य करू शकले.कारण त्यांच्या पाठीशी ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीमाई खंबीरपणे उभ्या होत्या.समाजाने बहिष्कृत केलेल्या लोकांसाठी कार्य करत असल्याचा सावित्रीमाईंना अभिमान होता.म्हणून तर त्या आपल्या कवितेत लिहितात,
महार मांगाची l
करते मी सेवा ll
आवडीच्या देवा l
स्मरूनिया ll
सेवा सत्यधर्म l
देई समाधान ll
ठेवी शांत मन l
आपले रे ll
इथल्या शेतकरी-कष्टकरी समाजाचे दुःख महात्मा फुलेंनी आपल्या शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथातुन मांडले.बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा होता त्याच्या राज्यातील प्रजेला कशाचाही त्रास नव्हता.अशा बळीराजाचं गुणगान करताना सावित्रीमाई काव्यफुले या काव्यसंग्रहातील 31 व्या कवितेत लिहितात.
“दानशूर बळी होता l
सुखी त्यांचे प्रजाजन ll
राज्यात सर्व संतोषी l
त्याचे त्रिलोकी कीर्तन ll”
पहिल्या महिला शिक्षिका म्हणून आपल्या सर्वांना माहीतच आहेत परंतु त्या उत्तम कवयित्री सुद्धा होत्या त्यांनी ‘काव्यफुले’ ‘बावन्नकशी सुबोध रत्नाकर’,’ज्योतिबांची भाषणे’ यासारखे अनेक ग्रंथ लिहिले.
महात्मा फुलेंच्या निधनानंतर सावित्रीमाईंनी अतिशय खंबीरपणे सत्यशोधक समाजाचे नेतृत्व केलं. सासवडला भरलेल्या सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनात सावित्रीमाईंनी अभ्यासपूर्ण भाषण केलं.1897 साली पुण्यात प्लेगच्या साथीने थैमान घातलं होतं.मुलगा डॉ यशवंत फुले हा प्लेगची लागण झालेल्या रुग्णांची सेवा करत होता.एका लहान मुलाला प्लेगची लागण झालेली होती.त्याला उपचारासाठी कडेवर घेऊन जाताना सावित्रीमाईंनाही प्लेगची लागण झाली.आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत समाजासाठी कसं जगावं,याचा मूर्तीमंत आदर्श सावित्रीमाईंनी आपल्या वर्तनातून घालून दिला. आज महिला अनेक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीनेच नव्हे तर त्यांच्या पुढे जाऊन आपलं कार्य-कर्तृत्व गाजवताना दिसतात.हे महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांच्या त्यागाचं फळ आहे.त्यांना अभिवादन करताना सत्यवानाच्या सावित्रीची पारायणे करण्यापेक्षा जोतिबांची सावित्री समजून घेण्याचा संकल्प करूयात.
Comments are closed