पुणे,दि.१८ : – नवीन शैक्षणिक धोरण 2020 च्या प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या वतीने शिक्षकांसाठी तिसऱ्या टप्प्यातील तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या अनुषंगाने शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक 12 मार्च ते 14 मार्च 2024 या कालावधीत औंध पुणे शहर क्षेत्रामध्ये येणाऱ्या विद्यालयातील नववी ते बारावीच्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी मॉडर्न कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे येथील सुसज्ज अशा भारतरत्न लता मंगेशकर सभागृह येथे मोठया उत्साहाने राबविण्यात आला. औंध विभाग सर्व शिक्षा समन्वयक वैशाली शेवाळे यांनी केंद्र समन्वयक म्हणून काम पाहिले.
या प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी SCERT उपसंचालक डॉ. कमलादेवी आवटे, पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था प्राचार्या डॉ . नेहा बेलसरे, डाएटचे अधिव्याख्याता मा. डॉ.प्रभाकर क्षीरसागर, मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव, तसेच उपप्राचार्य प्रा. सुनिल डोईफोडे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली आणि उपस्थित प्रशिक्षणार्थी शिक्षकांना मार्गदर्शन केले.
डॉ. नेहा बेलसरे यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करताना शिक्षण हे संस्कारासाठी, मूल्य संवर्धन, कौशल्य विकसित करण्यासाठी असावे तसेच जगामध्ये भारताला महासत्ता आणि ज्ञानसत्ता बनवण्यासाठी विद्यार्थ्यांना मातृभाषेतूनच शिक्षण असावे असे मत प्रगट केले. डायटचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. प्रभाकर शिरसागर यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची वैशिष्ट्ये, उद्दिष्टे, ध्येय यांचा आढावा घेतला शिक्षकांनी आपले ज्ञान बदलत्या काळानुसार अद्यावत ठेवावे यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान वापरावे आणि विद्यार्थी हा वसुधैव कुटुंबकम या भावनेतून तयार व्हावा असे मत मांडले.
या संपूर्ण तीन दिवसात राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, अंतर समवाय क्षेत्र, नाविन्यपूर्ण अध्यापन, 21व्या शतकातील कौशल्य व भविष्यवेधी शिक्षण, व्यवसाय मार्गदर्शन समुपदेशन, कुमार अवस्थेतील मुले, शाळा आधारित मूल्यांकन , कृती संशोधन, माहिती तंत्रज्ञानाचा शिक्षणातील उपयोग आणि प्रभावी शैक्षणिक नेतृत्व यावर तज्ञ मार्गदर्शक वैशाली शेवाळे, डॉ. किशोरी उभे, प्रा. वाल्मीक वाघ, प्रा. बालाजी दहिफळे, रूपाली जोशी, प्रशांत आबणे, राज्य समुपदेशक भगवान पांडेकर, ममता जमवाल यांनी सखोल मार्गदर्शन केले. सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी बहुमोल असे सहकार्य केले. प्रशिक्षण खऱ्या अर्थाने यशस्वी केले. समग्र शिक्षाच्या मनीषा तनपुरे आणि वंदना बेलसरे यांचं बहुमोल असं सहकार्य लाभलं.
या प्रशिक्षण वर्गाची सांगता समारंभ प्रसंगी मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव तसेच उपप्राचार्य डॉ. सुनील डोईफोडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. झुंजारराव यांनी अध्यक्षीय भाषणाच्या वेळी प्रत्येक समस्येचे समाधान शिक्षणातच आहे शिक्षण प्रक्रिया ही निरंतर चालणारी आणि परिवर्तनशील आहे असे मत प्रगट केले.
शिक्षकांनी सतत नवनवीन कल्पना नाविन्यता आणि सर्जनशीलता जोपासावी तंत्रज्ञानाची कास धरून अध्ययन प्रक्रिया अधिकाधिक परिणामकारक करावी अशी भावना व्यक्त केली. प्रशिक्षणार्थींनी प्राथमिक स्वरूपात आपले मनोगत व्यक्त केले यात पुष्पलता बनसुडे यांनी संपूर्ण प्रशिक्षण वर्गाचा सारांश अतिशय चांगल्या स्वरचित कवितेतून व्यक्त केला. तज्ञ मार्गदर्शकांमधून प्रातिनिधिक स्वरूपात राज्य समुपदेशक श भगवान पांडेकर यांनी आपले विचार व्यक्त केले सांगता समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. बालाजी दहिफळे यांनी तर आभार प्रशिक्षण केंद्र समन्वयक वैशाली शेवाळे यांनी मांडले.
महाराष्ट्र राज्यातील सर्व बोर्डाच्या शाळांतील शिक्षकांनाही ड्रेसकोड लागू .
Comments are closed