पुणे,दि.२८ :- कला म्हणजे माणसाला माणूसपणाकडे घेऊन जाणारी पायवाट आहे. कला म्हणजे माणसातील सर्जनशीलता प्रवाहित करणारा झ-याचा हिरवाकाठ. कला माणसाच्या जगण्याला सौंदर्य प्रदान करते. तसेच माणसाचं जगणं अधिकाधिक सुसाह्य करत जाते. कला माणसाच्या जगण्याला उंची बरोबरच खोली देते. कलेमुळे दु:खाचा विसर पडतो. दु:खाला हलकं बनविण्याचं सामर्थ्य कलेत असतं. खरं तर कला हा विरंगुळा नसून माणसाला, समाजाला, सुसंस्कृत, संवेदनशील व विचारप्रवण बनवत असते. मानवाच्या आयुष्यात कलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.असे प्रतिपादन माजी प्राचार्य तथा जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश जगताप यांनी केले.

कलादर्पण कला, सांस्कृतिक आणि सामाजिक प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने प्रा.जयप्रकाश जगताप यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी जगताप बोलत होते.

बालगंधर्व रंगमंदिरातील कला दालनात आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या राष्ट्रीय कला प्रदर्शनाच्या निमित्ताने देण्यात येणाऱ्या जीवन गौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते जगताप यांना प्रदान करण्यात आला. यावेळी माई जगताप,ज्येष्ठ चित्रकार सुरेश लोणकर, दिलीप कदम, मुरली लाहोटी, दिलीप बोरले, प्रा.पल्लवी गोविंद घोडके, प्रा.महेश थोरात, कलासागर कला महाविद्यालयाचे प्राचार्य नवनाथ क्षीरसागर, जनता शिक्षण संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रा. सुभाष जावळे, उपाध्यक्ष रमेश कार्ले आदींसह पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातही शाळांचे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक उपस्थित होते.

जगताप पुढे म्हणाले की कला हा एकमेव असा प्रकार आहे, की ज्यामुळं माणूस पशूपेक्षा वेगळा ठरू शकतो. कला आयुष्यात खूप महत्त्वाची असून ती माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवते. स्वप्न पहायला आणि सत्यात आणायलाही शिकवते. कला ही प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा भाग असायला हवी. असं असेल तरच तो समाज सुसंस्कृत, सुदृढ व कलासक्त म्हणता येईल. विज्ञान व तंत्रज्ञान यांच्या प्रगतीनं भारावून गेलेल्या माणसाला, माहिती व तंत्रज्ञानाच्या आभासी जगातून काही काळ दृष्यकलेच्या अभिजात कलाकृती आणि त्यांच्या निर्मात्यांच्या जादुई दुनियेत कला घेऊन जाते.

राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत ५१ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यातील १५ हजारविद्यार्थी स्पर्धेसाठी पात्र झाले या विद्यार्थ्यांचे चित्र प्रदर्शन कला दालनात भरविण्यात आले होते.यामधील विजेत्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश चिंगाटे व सुनिता चिंगाटे यांनी केले तर आभार दिलीप पटणे यांनी मानले. यानिमित्ताने कला शिक्षक मुरली लाहोटी व संजय टिक्कल यांनी कला प्रात्यक्षिक सादर केले.

 


 

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत १८३ उमेदवारांचे २२९ अर्ज दाखल

 

समाजातील अस्थिर घटकाला मदत करा चिंचवड पोलिसांचे आवाहन

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!