पिंपरी १७ :- हजारो वर्षांची जातीयतेची आणि वर्गीयतेची उतरंड महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नाकारली. उपेक्षित – वंचित घटकांना या महामानवांनी शिक्षणाची संधी निर्माण केली. महात्मा फुले यांनी स्त्री – शिक्षणाला प्राधान्य देत प्राथमिक शिक्षणावर भर दिला, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’ असा नारा देत उच्च शिक्षणावर भर दिला. माणसाच्या जीवनात सर्वांगीण परिवर्तन शिक्षण करू शकते हा आत्मविश्वास दिला. एकूणच काय भारतीय समाजव्यवस्थेतील प्रत्येक घटकाला सन्मानाने जगण्याचा हक्क प्राप्त करून दिला, असे प्रतिपादन फर्ग्युसन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रकाश पवार यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाच्या वतीने महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली, सदर कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) माधव सरोदे होते. महात्मा जोतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय समाजव्यवस्थेला नवी दिशा देण्याचे अनमोल कार्य केले. अशा थोरा – मोठ्यांचे विचार शिक्षकांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावेत व विद्यार्थ्यांनी ते समाजापर्यंत पोहोचवावेत असा मनोदय व्यक्त करत समाजप्रबोधनाची चळवळ सतत तेवत राहिली पाहिजे असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.राजेंद्र पुजारी यांनी केले. कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. मृणालिनी शेखर, डॉ. दत्तात्रय हिंगणे, डॉ. संदीप नन्नावरे, प्रा. गणेश भांगरे, डॉ. तृप्ती अंब्रे, पर्यवेक्षक प्रा. रूपाली जाधव, प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

सदर प्रसंगी वाचन संस्कृती रुजावी, थोरा – मोठ्यांचे विचार विद्यार्थी आणि समाजापर्यंत पोहोचावेत यासाठी राष्ट्रीय सेवा योजना, इतिहास विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या सयुंक्त विद्यमाने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

 


 

 

 

 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!