मुंबई, दि. 3 :- लोकसभा निवडणुकीदरम्यान डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून तो समाजमाध्यमे , डिजिटल माध्यमांवरून प्रसारित करण्यात येत आहे. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधितांवर कडक कारवाई शासनामार्फत करण्यात येणार आहे. यासंदर्भात पोलीस महासंचालकांना सूचना देण्यात आल्या आहेत.
फोटोशॉप, मशीन लर्निंग (एमएल) किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) यांसारख्या विविध तंत्रांचा गैरवापर करून डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करण्यात येतो. निवडणुकीदरम्यान या तंत्राचा गैरवापर हा चिंतेचा विषय आहे. एखादा उमेदवार, राजकीय पक्ष किंवा निवडणुकीच्या मुद्द्याविषयी चुकीचे व्हिडिओ, ऑडिओ, फोटो तयार करण्यात येतात किंवा खऱ्या फोटो, ऑडिओ, व्हिडिओमध्ये फेरफार करून ते चुकीच्या पद्धतीने प्रसारित करण्यात येतात. असे गैरपद्धतीने तयार केलेले डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स किंवा फोटो खरे असल्यासारखे भासतात आणि त्यामुळे संबंधिताविषयी गैरसमज किंवा बदनामी होते. निवडणूक काळात अशा प्रकरणांमध्ये वाढ होत असून यावर आळा घालण्यासाठी तसेच स्वच्छ आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया होण्याच्या दृष्टीने ‘डीप फेक’ कंटेंट तयार करणाऱ्या आणि प्रसारित करणाऱ्या समाजकंटकांवर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत.
राज्य शासनामार्फत पोलीस महासंचालकांना यासंदर्भात सूचना देण्यात आल्या असून पोलीस खात्यामार्फत यासंदर्भात कार्यवाही करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगानेही विपर्यस्त माहिती रोखण्यासंदर्भात त्यांच्या मार्गदर्शिकेमध्ये सूचना दिल्या आहेत.
Comments are closed