पुणे दि.२(punetoday9news): – कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांना गती देण्यासोबतच तातडीने कोविड केअर सेंटरची उभारणी करण्यात यावी तसेच ग्रामीण रुग्णालयात समर्पित कोवीड आरोग्य केंद्र येत्या पाच दिवसात सुरू करावे, असे निर्देश कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज दिले. कोरोनाबाधित रुग्णांच्या अधिकाधिक संपर्क शोधण्यावर भर द्यावा तसेच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज शिरूर तालुक्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाचा आढावा घेतला. यावेळी आमदार अशोक पवार, माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देखमुख यांच्यासह शिरूर तालुक्यातील प्रशासकीय विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांना गती देण्यासोबतच ७०० बेडच्या कोवीड केअर सेंटरची उभारणी तसेच शिरूर व न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात समर्पित कोवीड आरोग्य केंद्र येत्या पाच दिवसात सुरू करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. सोबतच कोवीड केअर सेंटर व आवश्यक तिथे खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची सेवा घेण्यात येणार असून इंडियन मेडीकल असोसिएशनच्या सदस्यांनी यासाठी सेवा देणार असल्याचे सांगितले. याशिवाय शिरूर तालुक्यासाठी दोन हजार अँटीजेन कीट उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
Comments are closed