नवी सांगवी, ता. 2 ः दापोडी येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व डी टी पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील वीर महाराणा प्रताप स्काऊट पथकाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारताचे दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त व जनता शिक्षण संस्थेचे प्रेरणास्थान गुरुवर्य बाबुरावजी जगताप यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस पुणे जिल्हा भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा संस्थेचे सचिव प्रदीप ताकवले, प्रशालेचे प्राचार्य राम गोन्टे, उपप्राचार्य अंजली घोडके, पर्यवेक्षक विश्वास जाधव यांनी गांधीजी व लालबहाद्दुर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करुन त्यांना अभिवादन केले. त्यानंतर स्काऊट विभाग प्रमुख मिलिंद संधान यांनी गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तर पर्यवेक्षक जाधव यांनी गुरुवर्य जगताप यांना आपल्या भाषणातून अभिवादन केले.
त्यानंतर स्काऊट्स, आरएसपी व हरितसेनेच्या विद्यार्थ्यांनी सर्वधर्म प्रार्थना सादर केली. यात हिंदू, मुस्लिम, बौद्ध व ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थना विद्यार्थांनी सादर केल्या. यावेळी प्रार्थणा सभेचे वातावरण प्रसन्न व भक्तीमय झाले होते. त्यानंतर स्काऊटच्या विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीवर नाटीका सादर केली. सांस्कृतिक विभाग प्रमुख अनिल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. रामदास पोळ यांनी प्रास्ताविक तर हर्षदा गोन्टे यांनी आभार मानले जेष्ठ शिक्षिका सविता बोत्रे संजय शिरसाठ, प्रकाश आवटे, गंगाधर पवार, संजय झराड यांच्यासह इतर शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी केला.
फोटो ः WA0018.jpg आणि 094055.jpg दापोडी ः स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व डी टी पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील स्काऊटच्या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी व लालबहाद्दुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त व्यसनमुक्तीवर नाटीका सादर केली.
Comments are closed