नाशिक, दि.११ :-

“त्यांच्या आणि आपल्या जगण्यात

खूप खूप दुरावा

त्यांचा करायचा नाही हेवा

किंवा करायचा नाही राग

आपल्या वाट्याला आली माती

त्यातच फुलवू नवी बाग..”

 

यासारख्या काळजाला ठाव घेणाऱ्या संदीप जगताप यांच्या कवितानी अमेरिकेतील मराठी माणसांची प्रचंड दाद मिळवली. शिकागो येथील महाराष्ट्र मंडळाच्या वतीने कवी संदीप जगताप यांचे ऑनलाइन व्याख्यान भारतीय वेळेनुसार दहा तारखेला सकाळी साडेसहा वाजता आयोजित केले होते. याप्रसंगी संदीप जगताप यांनी कवितांची गुंफण करत सव्वा तास संवाद साधला.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची इथल्या सामान्य माणसाची सामाजिक व आर्थिक परिस्थिती यावर संदीप जगताप यांनी अचूक बोट ठेवले. समाजामध्ये वाढत असणारा जातिवाद, धर्मवाद हा भारतीय माणसाच्या प्रगतीतील मोठा अडसर आहे . यामुळे या समाजात मानवतावाद वाढला पाहिजे.अशा आशयाची-

 

” आज माझ रक्त त्याच्यात

त्याच रक्त माझ्यात..

दोघांमध्ये कुठला धर्म किंवा जात नाही उरली

एक बाटली रक्ताने

आमच्यातली धर्माची भिंत कोसळली

एकमेकांना कडाडून मिठी मारताना

दोघांच्या डोळ्यात भावनांची दंगल उसळली…”

दंगल या कवितेने रसिकांची दाद मिळवली.

कविता सादर करत असताना त्यांनी कुटुंब व्यवस्था आणि समाजातली सांस्कृतिक परिस्थिती मजबूत व्हायला पाहिजे. घाम गाळणाऱ्या कष्ट करणाऱ्या प्रत्येक माणसाला त्याच्या कष्टाच मोल मिळालं पाहिजे. यासाठी सामान्य माणसाच्या बाजूने उभी राहणारी सशक्त राज व्यवस्था उभी राहिला हवी. पण दुर्दैवाने छत्रपती शिवरायांसारखा राजा भारतीय स्वातंत्र्यानंतर भारताला मिळत नाहीये. अशी खंत तुकाराम कवितेतून व्यक्त केली.

 ” पिकाच्या मुळावर उठलेलं तन

   आम्ही चिमटून घेतो खुरपून घेतो..

   सूर्य मावळे पर्यंत 

   आमच्या कष्टाला अंत नाही

   पण आमच्या घामावर

   समाजातले किती तन पोसतय

   याची कुणालाच कशी खंत नाही..”

 

या कार्यक्रमाला अमेरिकेत राहणारे अनेक मराठी रसिक जॉईन झाले होते. बहिणीच्या लग्नाची सी डी, इन्स्पेक्शन या कवितानी कार्यक्रम बघणाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. कार्यक्रम संपल्यानंतर देखील लोकांनी संदीप जगताप यांच्याशी अर्धा तास स्वतंत्र संवाद साधला. महाराष्ट्रातील गरजू मुलांसाठी आम्ही मदत करू असे आश्वासन देखील दिले. संदीप जगताप यांच्या कविता व व्याख्यानामुळे आम्हाला पुन्हा गावाकडचे जीवन डोळ्यासमोर आले. भारताची आणि तिथल्या गावाची तीव्र आठवण झाली. त्यामुळे आम्ही तुमचे ऋणी आहोत. अशा प्रतिक्रिया दिल्या. या कार्यक्रमाचे संयोजन महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष माधव गोगावले यांनी केले होते.

 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!