जेजुरीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण

जेजुरी,दि.२१ :-  पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या लढाऊ बाण्याच्या , करारी आणि प्रजाहितदक्ष अशा राजकारणी होत्या. त्यामुळे त्यांच्या नावाने मिळालेल्या या पुरस्काराने मनस्वी आनंद झाला आहे ,अशी भावना पुरस्काराला उत्तर देताना डॉ. मेधा पुरव – सामंत यांनी व्यक्त केली.

आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदरच्या जेजुरी येथील शरदचंद्रजी पवार महाविद्यालयाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला .याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष विजय कोलते, पुरस्कारार्थी डॉ.मेधा पुरव – सामंत , डॉ.रमेश अवस्थी, शांताराम पोमण, बंडूकाका जगताप ,शिवाजी घोगरे , संभाजी काळाने अविनाश भालेराव , राजेंद्र बरकडे ,अरुण जोशी, नंदूकाका जगताप, राजेंद्र पेशवे प्राचार्य डॉ. धनाजी नागणे , उपप्राचार्य डॉ. बेबी कोलते आदी मान्यवर उपस्थित होते.

मा.राजे भूषणसिंह होळकर पाहुणे म्हणून कार्यक्रमासाठी उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा देऊन पुरस्कारार्थीचे, संस्थेचे आणि महाविद्यालयाचे कौतुक केले.

याप्रसंगी विद्यापीठ परीक्षेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल धनश्री सतीश कुदळे व कोमल नानासो कापरे या विद्यार्थिनींचा आणि निबंध स्पर्धेत ज्ञानेश्वरी श्याम पवार (प्रथम ) सिद्धी राजेश चोरगे (द्वितीय ) क्रमांक मिळविल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.

डॉ. मेधा पुरव -सामंत पुढे म्हणाल्या , पुरोगामी विचारांच्या आई-वडिलांचा संस्कार माझ्यावर झाला. त्यामुळे जाती – धर्माच्या ,भेदांच्या पलीकडे जाऊन महिला सक्षमीकरणासाठी अन्नपूर्णा परिवारांच्या मतीने आजवर काम करता आले. महिला आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण कशा बनतील आणि आत्मविश्वासाने मुख्य प्रवाहात कशा येतील, यासाठी जी वाटचाल करता आली त्याविषयीचा जीवनानुभव त्यांनी उलगडून सांगितला .शाहीर अमर शेख ,अण्णाभाऊ साठे, काॅम्रेड डांगे यांच्या विचारांचा संस्कार घेऊन वाटचाल केल्याचे त्यांनी सांगितले .आजची राजकीय परिस्थिती न बोलण्यासारखी आणि न पाहण्यासारखी आहे .परंतु समाज जीवन जवळून पाहणारा आणि खऱ्या अर्थाने सामाजिक प्रश्नांची जाण असणारा शरद पवार साहेबांसारखा नेता ही आश्वासक बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. संकटातून संधी शोधायला हवी आणि सचोटीने निष्ठेने यश प्राप्त होते ,असा आत्मविश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ.रमेश अवस्थी , यांनी तीनशे वर्षांपूर्वी अहिल्यादेवींनी जो स्त्री – पुरुष भेदांतीत विचार मांडला तो किती धाडसी आणि पुरोगामीत्वाला पुढे नेणारा होता हे त्यांच्या जीवन कार्यातून दिसून येते. एक स्थायी प्रशासन त्यांनी माळवा प्रांताला मिळवून दिले ‌.आजचे एकूणच समाजकारण आणि राजकारण चिंता वाटावे असे आहे .शिक्षणाकडे आपल्या राजकारण्यांचे झालेले दुर्लक्ष परवडणारे नाही. सहकारी संस्था राजकारण केंद्रीत झाल्याने त्यांचा सामान्य लोकांना म्हणावा तसा लाभ होऊ शकला नाही. प्रत्यक्षात समाज कसा जगतो हे शरद पवार साहेबांसारखा एखादा अपवाद सोडला तर फार थोड्या राजकारणी लोकांना ते समजले आहे .एकूणच शिक्षण महाग होते आहे. शिक्षणावरची निष्ठा, आस्था कमी होते आहे .या संदर्भात पालकांची मानसिकता बदलायला हवी. सर्वांना मोफत शिक्षण दिले तरच सामान्यांची मुले शिकू शकतील. आजची तरुण पिढी जर ज्ञानावर निष्ठा ठेवणारी निर्माण झाली तरच देश बदलू शकतो , असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना विजय कोलते म्हणाले , संस्था आणि महाविद्यालय यांच्या उभारणीत मा. शरद पवार साहेब यांचा वाटा महत्त्वपूर्ण आहे . जेजुरीतील महाविद्यालय अहिल्यादेवी होळकर यांच्या वाड्यात सुरू केले .हे महाविद्यालय आज चिंच बागेत सुरू आहे. अहिल्यादेवी विषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समाजात महिला विषयी कार्य करणाऱ्या महिलांना त्यांच्या नावाने पुरस्कार देण्याचे आम्ही ठरविले आहे. अहिल्यादेवींच्या कार्याचा ,विचाराचा वारसा शिक्षणाच्या माध्यमातून पुढे चालू ठेवण्याचे काम आम्ही करीत आहोत, असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.धनाजी नागणे यांनी केले. सन्मानपत्राचे वाचन शांताराम पोमण , सूत्रसंचालन प्रा. डॉ.अरुण कोळेकर यांनी तर आभार डॉ. बेबी कोलते यांनी मानले .

कार्यक्रमासाठी बाळासाहेब लेंडे , प्रकाश खाडे, आप्पा बयास ,प्रकाश फाळके ,संदीप टिळेकर, प्रकाश भामे , दामूअण्णा कदम ,रणसिंग पवार, आप्पा बयास , स्वानंद लोमटे , मीना शेंडकर , वैशाली कुंभारकर , श्रीकांत लक्ष्मी – शंकर ,छाया मल्लाव , देवा भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!