पुणे, दि. २८: पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे २ सप्टेंबर रोजी श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगाने वाहतूक कोंडी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत.
वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून २ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजेपासून ते रात्री १२.०० वाजेपर्यंत पुणे जेजुरी-बारामती महामार्गावरील जड, अवजड व इतर वाहतूक बंद करुन अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
जेजुरी पोलीस ठाणे हद्दीत सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुणे येथे जाण्याकरीता जेजुरी-सासवडकडे येणारी जड, अवजड व इतर वाहतूक पूर्णपणे बंद करुन त्यावरील वाहने नीरा-मोरगाव-सुपा ते केडगाव चौफुला मार्गे सोलापूर महामार्गाने पुणे अशी वळविण्यात येत आहे. जेजुरी बेलसर फाटा मार्गावर पुण्याकडून बारामतीकडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद करुन बेलसर-कोथळे-नाझरे-सुपे-मोरगाव मार्गे बारामती, फलटण व साताराकडे जातील.
सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बारामती व नीरा बाजूकडून जेजुरी मार्गे पुणे बाजूकडे जाणारी वाहतूक पुर्णपणे बंद करुन ती मोरगाव-सुपा-केडगाव चौफुला मार्गे सोलापूर महामार्गाने पुण्याकडे वळविण्यात येत आहे.
सासवड पोलीस ठाण्याअंतर्गत पुणे बाजूकडून जेजुरी मार्गे फलटण-सातारा बाजुकडे जाणारी जड, अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करुन सासवड- नारायणपुर-कापुरहोळ मार्गे सातारा-फलटण किंवा सासवड-वीर फाटा-परिंचे-वीर-वाठार कॉलनी मार्गे लोणंद अशी वळविण्यात येत आहे.
वाहतुकीस लावलेले निर्बंध २ सप्टेंबर रोजीच्या ‘श्री खंडोबा देवाची सोमवती यात्रे’करीता येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी शिथील राहतील. नागरिकांनी वाहतुकीत केलेल्या बदलाची नोंद घेवून सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
Comments are closed