पुणे, दि. १४: जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या उपस्थितीत ‘जागतिक वारसा नामांकनाचे आम्ही साक्षीदार’ स्वाक्षरी मोहिमेचे जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (१३ सप्टेंबर) आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले ‘मराठा लष्करी भूप्रदेश’अंतर्गत जागतिक वारसा नामांकनासाठी प्रस्तावित केले आहेत, त्याअनुषंगाने प्रचार प्रसारासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय व राज्य पुरातत्व विभागातील अधिकारी, कर्मचारी, डेक्कन महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थी प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवार (दि. १२ सप्टेंबर ) रोजी रागुरूनगर (ता. खेड) येथील हुतात्मा शिवराम हरी राजगुरू वाडा स्मारक येथे ‘जागतिक वारसा नामांकनाचे आम्ही साक्षीदार’ या स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला होता. काल जिल्हाधिकारी कार्यालयात या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी या मोहिमेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या स्वाक्षरीसाठीच्या फ्लेक्सवर स्वाक्षरी केली.

‘मराठा लष्करी भूप्रदेश’अंतर्गत जागतिक वारसा नामांकनासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या १२ किल्ल्यांमध्ये जिल्ह्यातील शिवनेरी, लोहगड, राजगड या किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे. नामांकनादरम्यान किल्ल्यांच्या प्रचार-प्रसारासाठी जिल्हा प्रशासन आणि पुरातत्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या गड किल्ले जागतिक वारसा स्थळ नामांकन जनजागृती मोहिमेत नागरिकांना सहभागी करुन घेण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असून त्यापैकी हा एक उपक्रम आहे, असे पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहणे यांनी सांगितले.

 

 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!