पुणे दि.५ ( punetoday9news):- –कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्गाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत बार्टीने देखील आपले काही प्रशिक्षण वर्ग सध्यस्थितीत बंद ठेवले होते. परंतु एमपीएससी व आयबीपीएसचे सर्व प्रकारचे प्रशिक्षण वर्ग बंद असल्याने महाराष्ट्रातील उमेदवार मोठ्या प्रमाणात मार्गदर्शनापासून वंचित आहेत. लॉकडाऊनच्या काळात आपल्या गावी अडकलेल्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी मोठी आर्थिक चणचण भासत आहे. ऑनलाईन पद्धतीने व्यावसायिक प्रशिक्षण वर्गाचे प्रशिक्षण शुल्क भरण्यासाठी उमेदवाराकडे सद्यस्थितीत पैसे नाहीत. प्रशिक्षण कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने राबविण्याकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे व राज्यमंत्री विश्वजित कदम तसेच सचिव पराग जैन- नानुटीया यांनी केलेल्या सूचनांनुसार बार्टीचे महासंचालक कैलास कणसे यांनी ऑनलाईन प्रशिक्षणाचे नियोजन केले आहे.
महाराष्ट्रातील सर्व जाती-धर्मातील उमेदवारांना एमपीएससी परीक्षेकरिता ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले व त्याबाबत सोशल मिडियावर मोठ्याप्रमाणात प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रचार व प्रसार करण्यात आला होता. या प्रशिक्षण वर्गासाठी ९० हजारापेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केले होते. या प्रशिक्षणाची सुरुवात २४ जुलै २०२० रोजी झाली असून या प्रशिक्षणासाठी उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या प्रशिक्षणाचे थेट प्रक्षेपण युट्युब व फेसबुक वर होत असून याचा दीड लाखांपेक्षा जास्त उमेदवारांना लाभ होत आहे. महाराष्ट्रातील सर्व भागातील उमेदवारांनी या प्रशिक्षणास मोठया प्रमाणावर प्रतिसाद दिला आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेणारे उमेदवार महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील असून बार्टीमार्फत देण्यात येणारे हे प्रशिक्षण दर्जेदार असल्याबाबतही प्रतिक्रिया व्हिडीओवरील प्रतिक्रियांवरुन दिसून येते. या युट्यूब चॅनेलवर ६ लाखांपेक्षा जास्त दर्शकांनी भेटी दिल्या असून ७७ हजारपेक्षा जास्त सबस्क्राईबर झाले आहेत. एमपीएससी प्रशिक्षण यासोबतच या दर्जाचे इतरही प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने बार्टी संस्थेने आयोजित करण्याबाबत विद्यार्थी मागणी करत आहेत.
बार्टीमार्फत देण्यात येणा-या प्रशिक्षणाकरीता महाराष्ट्रातील नामवंत प्रशिक्षक तज्ञ उमेदवारांना मार्गदर्शन करीत असून त्यात इतिहास या विषयाकरिता डॉ. शैलेश कोळेकर, राज्यशास्त्र या विषयाकरिता डॉ. चैतन्य कागदे. सीएसएटी विषयाकरिता प्रा. संतोष वट्टमवार हे मार्गदर्शन करीत असून पुढील सत्रांमध्ये अर्थशास्त्र या विषयाचे मार्गदर्शन डॉ. किरण देसले करणार आहेत तर भूगोल या विषयाचे मार्गदर्शन हे महाराष्ट्र विकास सेवेतील वर्ग १ चे अधिकारी श्री. सतीश पाटील करणार आहेत. तसेच सीएसएटी व विज्ञान या विषयासाठी श्री. विवेक पाटील व श्री.राहुल देशमुख मार्गदर्शन करणार आहेत.
सदरचे प्रशिक्षण हे प्रत्येक दिवशी सकाळी ८ ते १२ यावेळेत BARTI Online MPSC या यू ट्यूब चॅनेलवर होत असून ग्रामीण विद्याथ्यांना याचा विशेष लाभ होत आहे. जे विद्यार्थी प्रशिक्षणापासून वंचित आहेत त्यांनी या चॅनेलवर प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहान बार्टीचे महासंचालक श्री. कैलास कणसे यांनी केले आहे. पुढील काळात पुढील आठवड्यात यूपीएससी व आयबीपीएसचे ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण सुरु होणार आहे. त्याचा देखील उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. या प्रशिक्षणासाठी बार्टीचे निबंधक यादव गायकवाड, स्पर्धा परीक्षा विभागाचे प्रकल्प संचालक कुणाल शिरसाठे, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रकल्प संचालक प्रशांत बुद्धिवंत, प्रकल्प अधिकारी दयानंद धायगुडे व नरेश जुड़े हे समन्वयाचे काम पाहतात.

Comments are closed

error: Content is protected !!