जेजुरी , दि.१५ :-    हिंदी भाषा ही आपली राष्ट्रभाषा. या भाषेतील माधुर्य, संवेदनशीलता, शब्द संपत्तीचा प्रभाव, साधेपणा व लवचिकता, अनेक बोली भाषांना सामावण्याची क्षमता, सांस्कृतिक विविधता, आधुनिक आणि पारंपारिक तत्वांचा संगम यामुळे ही भाषा भारतातच नव्हे तर जगभरात लोकप्रिय आणि प्रभावी भाषा ठरली आहे.हिंदी भाषेतून पत्रकारितेच्या अनेक संधी उपलब्ध आहेत, कारण हिंदी ही भारतातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा असून माध्यम क्षेत्रात तिचे व्यापक प्रस्थ आहे. असे विचार पत्रकार कादंबरी नलावडे यांनी व्यक्त केले.

शरदचंद्रजी पवार महाविद्यालय ,जेजुरी या ठिकाणी हिंदी दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. पत्रकारितेतील संधीबाबत बोलताना त्यांनी सांगितले, हिंदीतून प्रिंट मीडियात पत्रकारितेची सुरुवात करण्यासाठी वृत्तपत्रे आणि साप्ताहिके एक महत्त्वपूर्ण पर्याय आहे.हिंदी टीव्ही न्यूज चॅनेल्सवर पत्रकार आणि अँकरची मागणी मोठ्या प्रमाणात असते. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर हिंदीतील लेख, न्यूज, ब्लॉग, आणि व्हिडिओ कंटेंटची मागणी वाढली आहे. हिंदी न्यूज पोर्टल्स किंवा वेब मॅगझिन्स वर काम करण्याच्या संधी उपलब्ध आहेत. हिंदीतून रेडिओ जॉकी, समाचार वाचक, किंवा समालोचक बनून विविध हिंदी रेडिओ चॅनेल्सवर काम करण्याच्या संधी आहेत. आकाशवाणी, एफएम चॅनेल्सवर विविध कार्यक्रमांची निर्मिती आणि सादरीकरण करता येते.जर आपल्याला स्वातंत्र्याने काम करायचे असेल, तर हिंदीतून फ्रीलान्स पत्रकारिता किंवा लेखन हे उत्तम पर्याय आहेत. विविध प्रकाशने, वेब पोर्टल्स, आणि मॅगझिन्ससाठी स्वतंत्र लेखक किंवा पत्रकार म्हणून काम करता येते.आंतरराष्ट्रीय किंवा प्रादेशिक भाषांमधून हिंदीत अनुवाद करण्याच्या संधी देखील भरपूर आहेत. विशेषतः पत्रकारिता आणि मीडिया क्षेत्रात वेगवेगळ्या भाषांमधील बातम्या हिंदीमध्ये अनुवाद करून सादर केल्या जातात.
त्यामुळे विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेतून आपले करिअर करावे. यावेळी महाविद्यालयामध्ये हिंदी सप्ताह निमित्ताने आयोजित केलेल्या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.  निबंध स्पर्धेत सृष्टी राजेंद्र फडतरे प्रथम, निशिगंधा दत्तात्रेय कोतुळकर द्वितीय, सिद्धी राजेश चोरघे तृतीय. काव्यवाचन प्रतियोगिता अश्विनी पोपट सोनवले प्रथम, निशिगंधा दत्तात्रय कोतुळकर द्वितीय, ज्ञानेश्वरी श्याम पवार तृतीय तर वक्तृत्व स्पर्धेत हर्षल उद्धव पाटील प्रथम, अश्विनी पोपट सोनवले द्वितीय, दुर्गा अजयसिंह रायमेहता तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व मेडल देऊन सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. धनाजी नागणे होते. कार्यक्रमाचे नियोजन व प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख व महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. बेबी कोलते यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. संगीता पवार,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी अश्विनी सोनवले हिने तर आभार प्रा. कल्पना रोकडे यांनी मानले. याप्रसंगी सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!