“जगात भारी, भारतीय संस्कृती” अशा पद्धतीने विचार मांडत असताना दुसरीकडे पाश्चिमात्य देशातील डीजे संस्कृतीचे सर्वत्र अंधाधुंद अनुकरण करताना भारतातील नवीन पिढी दिसत आहे. यामध्ये भारतीय परंपरा, संस्कृती ही विलोप होताना काही प्रमाणात दिसून येत आहे. भारतीय सण समारंभ हे शांतता प्रिय तसेच आनंद उत्सव म्हणून साजरे होतात. यात गल्लोगल्ली वाढणाऱ्या डीजेच्या अतिक्रमणाने संस्कृतीचे विकृतीकरण होत असल्याचेही भयानक वास्तव समोर येत आहे. त्याचीच मांडणी करताना देहू येथील कवी व सामाजिक कार्यकर्ते संदीप परंडवाल यांनी केलेली वास्तववादी कविता विसर्जन.
विसर्जन !
माफ कर देवा इथे झुंडशाही जोरात आहे!
निरोप देण्या तुला डीजे चा थयथयाट आहे!!
संस्कृतीच्या कळसावर पडलाय विकृतीचा घाला !
धांगडधिंगा तुझ्यापुढे अन कर्णकर्कश बोलबाला!!
आमच्याच संस्कृतीचे आम्ही काढतोय धिंढवडे!
कधी कळणार अन उमगणार सांगा सात्विकतेचे धडे!!
थिरकणाऱ्या पावलांना मद्याने चढते गती!
अध्यात्माची,विवेकाची मात्र सालोसाल अधोगती!!
प्रेम करतात तुझ्यावर त्यात नाही शंका!
पण विसरत चाललोय संस्कृती याचीच आम्हा चिंता!!
तू जात असताना जर सारे ठेवत असतील कानावर हात!
तूच सांग देवा तुला पटते का ही वाताहात!!
कटू असेल कदाचित पण म्हणून सत्य लपत नाही!
वृद्ध, बालक,रोगीष्ट यांची बेदखल योग्य नाही!!
षोडशोपचार पूजेमध्ये सापडत नाही हा दणदणाट!
पवित्र पूजे अर्चेला नसत्या नादाचा नाट!!
श्रीमंत,मानाचा,राजा यात अडकवलंय तुलाही देवा!
तू मोठा की मी मोठा हेच समीकरण जावे त्या गावा!!
निरोप देतो देवा आता जास्त काही बोलत नाही!
रिद्धी सिद्धिचा देवता तू म्हणूनच हे पटत नाही!!
बुद्धीच्या देवता सर्वांना सद्बुद्धी दे!
पुढच्या वर्षी येताना मात्र भक्ती-भाव अन शांती दे!!
– संदीप दि.परंडवाल
Comments are closed