विशेष राजकीय विश्लेषण : पत्रकार अतुल माळी.

 उमेदवारी अर्ज भरण्याकरिता उरले केवळ पाच दिवस..

पिंपरी, दि.२५ :- म‌हायुतीने शहरातील भोसरी, पिंपरी आणि चिंचवड या मतदारसंघामध्ये उमेदवार जाहीर करून महाविकास आघाडीवर वरचढ ठरली आहे.उमेदवारी जाहीर होताच भोसरी आणि चिंचवड मतदार संघातून भाजपच्या दोन्ही उमेदवारांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. तर पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीने (अजित पवार) बुधवारी उमेदवार जाहीर केला असल्याने या मतदारसंघात सुद्धा प्रचाराला सुरवात होणार आहे. असे असताना दुसरीकडे मात्र मुख्य विरोधी असलेल्या मविआत मात्र जागा वाटपावरून संभ्रमावस्था दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ पाचच दिवसांचा अवधी शिल्लक असताना कोणत्या विधानसभा मतदारसंघातून कोणत्या पक्षाचा उमेदवार असणार हेच अद्याप स्पष्ट नाही.

महाविकास आघाडीकडे इच्छुकांची गर्दी.

लोकसभेच्या निवडणुकीनंतर बदलाच्या वाऱ्याचा अंदाज घेत महाविकास आघाडीतील शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटात जोरदार ‘इनकमिंग” सुरू आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघ ‘मविआ’तील कोणत्या पक्षाला सुटणार, याबाबत तर्कवितर्क केले जात आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे अनेकजण निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. परंतु माविआ चे पक्षश्रेष्ठी महायुतीतील नाराजांवर करडी नजर ठेवून आहेत. सध्या तीनही मतदारसंघात इतर पक्षातून आलेले किंवा येण्याच्या तयारीत असलेल्या इच्छुकांचीच नावे चर्चेत आहेत. मात्र महाविकास आघाडीच्या पक्षाशी निष्ठावान असलेल्या इच्छुकांची नावे चर्चेत बरीच मागे पडली आहे. यामुळे मविआची संपूर्ण मदार आयात उमेदवारांवरच असण्याची शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवित आहेत.

मविआ कडे अनेकांनी दिल्या मुलाखती

लोकसभेच्या अभूतपूर्व यशानंतर पिंपरी चिंचवड शहरात विधानसभा निवडणुकीची तयारी जोरदार सुरू झाली होती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जोरदार इनकमिंगही सुरू झाले होते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने इच्छुकांकडून अर्ज मागविले. त्यांना पुण्यात बोलावून त्यांच्या मुलाखती घेतल्या. काहींना तयारीला लागण्याचे संदेशही दिले गेले परंतु आता या पदाधिकाऱ्यांची नावे क्वचितच चर्चेत येत आहेत.

काँग्रेसचे पदाधिकारी मात्र गप्प

शहरातील तीनही मतदार संघावर राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आपल्याला मतदार संघ मिळावा यासाठी रस्सीखेच करताना पहावयास मिळत असताना काँग्रेस मात्र कोणत्याच मतदार संघावर दावा करीत नसल्याचे पहावयास मिळत असल्याने काँग्रेस पक्षातील पदाधिकारी कोणत्या मित्र पक्षाला कोणती जागा सुटेल याकडे लक्ष देऊन असल्याचे पहावयास मिळत आहे.कॉंग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बहुधा तीनपैकी एकही मतदारसंघ आपल्याला मिळणार नाही, असे मानून शांत राहणेच पसंत केले आहे.

मविआ कडून अनेक नावे चर्चेत.

शहरातील तीन मतदारसंघा पैकी भोसरी आणि चिंचवड मतदार संघात महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक जण मुंबई वारी करीत असल्याचे पहावयास मिळत आहे.भोसरी मतदार संघातून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून अजित गव्हाणे तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कडून रवी लांडगे उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.चिंचवड मतदार संघातून महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळविण्यासाठी उमेदवारांची तोबा गर्दी पहावयास मिळत आहे.

चिंचवड मतदार संघाबाबत संभ्रम.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा वाढत चालला आहे. या जागेवर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने तयारी चालवली असतानाच आता शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने घटक पक्षांवर कुरघोडी करणे सुरु केले आहे. शरद पवार गटाने उमेदवार आयात करण्याची चाल आखली आहे,अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील मोरेश्वर भोंडवे यांनी नुकताच मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती मध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे चिंचवडची जागा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाला मिळणार असे चित्र जवळपास निश्चित झाले असे मानले जात असताना अजित पवार गटाचे नाना काटे आणि शिवसेनेच्या पूर्वाश्रमाचे राहुल कलाटे यांनी नुकतीच मुंबई येथे शरद पवार यांची भेट घेतल्याने चिंचवड मतदार संघाबाबत शहरात उमेदवारां सह नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.


 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!