पिंपरी,दि.३१ :- शिक्षणासोबत विद्यार्थी सर्वगुणसंपन्न व्हावा यासाठी क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे सुप्तगुण व कला प्रदर्शित होतात. त्यामुळे स्रेहसंमेलनातूनही विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होतो.विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी स्रेहसंमेलन हे मोठे दालन आहे. यातून विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्र, नाट्यक्षेत्र, अभिनेता, नेता बनण्याची संधी मिळते असे मत आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केले.जनता शिक्षण संस्थेच्या जिल्ह्यातील विविध शाखेतील विद्यार्थ्यांसाठी पंडित भिमसेन जोशी सभागृहात आयोजित सांस्कृतिक महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी जगताप बोलत होते.
यावेळी सिनेअभिनेत्री सुवर्णा काळे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य जयप्रकाश जगताप, उपाध्यक्ष रमेश कार्ले, कार्याध्यक्ष माहेशकुमार आगम, खजिनदार कविता गोरे, जनरल सेक्रेटरी प्रा. सुभाष जावळे, जॉईंट सेक्रेटरी रविंद्र नवले,असिस्टंट सेक्रेटरी प्रा प्रदीप नागवडे,राजेंद्र खरमाटे,संचालक प्राचार्य हेमंत तांबे, बाळासाहेब पोळ, माजी सचिव वसंतराव जगदाळे, दादा माई विचार मंचाचे अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, रवी कावेडीया,गायत्री देशमुख आदी उपस्थित होते. जनता शिक्षण संस्थेत शिकणारा प्रत्येक विद्यार्थी आदर्श घेवून समाजात उत्कृष्ट कार्य करणारा बनावा. उच्च शिक्षित होऊन स्वपालनासह सामाजिक, राजकीय, व्यावसायिक क्षेत्रात आपले नाव उज्ज्वल करावे अशी अपेक्षा आमदार जगताप यांनी व्यक्त केली.
‘एकता में ही, भारत की सुंदरता’ या संकल्पनेवर आधारित असणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवात विद्यार्थ्यांनी विविध राज्याचे नृत्याविष्कार सादर केले. परीक्षक म्हणून फिरोज मुजावर,किशोर दळवी,आनंद खुडे,वैभवी क्षीरसागर, तन्वी शेमडकर यांनी काम पाहिले. प्रास्ताविक कविता गोरे यांनी केले. सूत्रसंचालन राजेश लगड यांनी केले तर आभार संस्थेच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख गायत्री देशमुख यांनी मानले.
सांस्कृतिक महोत्सवाचे विजेते :-
पहिली ते चौथी गट-
प्रथम : श्री शिवाजी विद्यामंदिर, चाकण (केरळ राज्य)
द्वितीय : पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यामंदिर, जेजुरी (दिंडी नृत्य)
पाचवी ते आठवी गट-
प्रथम :श्री.शिवाजी विद्यामंदिर, चाकण (तेलंगणा राज्य)
द्वितीय : श्री. शिवाजी विद्यामंदिर औंध (जम्मू काश्मीर राज्य)
नववी ते बारावी गट-
प्रथम : ब्लॉसम इंग्रजी माध्यम,दापोडी (मिझोरम राज्य)
द्वितीय : पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यामंदिर, जेजुरी (शिवराज्यभिषेक सोहळा)
जनता शिक्षण संस्था अंतर्गत सांस्कृतिक महोत्सव
एकता में ही भारतकी सुंदरता.
Comments are closed