पुणे दि,७ (punetoday9news) :- पर्यावरणपूर्वक धोरण व विजेच्या खर्चात बचत करण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वेकडून सौरऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीवर भर देण्यात येत आहे. राज्यातील विविध स्थानकांवर सध्या कार्यान्वित करण्यात आलेल्या आणि भविष्यात नियोजित करण्यात आलेल्या सौरऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून वीज खर्चात वर्षांला तब्बल सव्वाशे कोटी रुपयांच्या बचतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
लोहमार्गालगत मोकळ्या असलेल्या रेल्वेच्या जागेतही पुढील काळात सौरऊर्जा प्रकल्पांची उभारणी केली जाणार असल्याचे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले.मध्य रेल्वेच्या पाच विभागांमध्ये आणि चार कार्यशाळांमध्ये छतावरील सौरऊर्जा प्रकल्पांची योजना आखण्यात आली आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, पुणे रेल्वे स्थानक आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या ईएमयू कारशेडसह इतर इमारतींच्या छतावर तसेच फलाटांच्या छतांवर एकूण ४.२ मेगावॉट क्षमतेच्या सौर यंत्रणेची उभारणी पूर्ण करण्यात आली आहे. हे प्रकल्प कार्यान्वित झाले असून, त्यातून वर्षांला ४.१ कोटी रुपयांची बचत होत आहे. इतर प्रकल्पांचे काम सुरू असून, तेही लवकरच कार्यान्वित केले जाणार आहेत. त्यातून १२ दशलक्ष युनिट विजेची निर्मिती केली जाणार असून, वार्षिक ७.३७ कोटी रुपयांच्या बचतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
छतांवरील प्रकल्पांबरोबरच रेल्वेच्या जागांवरही मोठ्या प्रमाणात सौरऊर्जा प्रकल्पांची उभारणी केली जाणार आहे. लोहमार्गालगत मोकळ्या असलेल्या जागांचाही त्यात समावेश करण्यात येणार आहे. १०९ मेगावॉट क्षमतेच्या या प्रकल्पांसाठी जागांची निश्चिती झाली आहे. लोहमार्गालगतच्या जागेसह विविध ठिकाणी रेल्वेचे मोकळे भूखंड असून, त्यांचीही सौरऊर्जा प्रकल्पासाठी निश्चिती करण्यात आली आहे. या प्रकल्पांना येत्या काळात गती देण्यात येणार आहे. या सर्व प्रकल्पांतून भविष्यात वर्षांला मध्य रेल्वेच्या वीज खर्चात सव्वाशे कोटींच्या आसपास बचत होऊ शकणार आहे.
Comments are closed