• आगामी अर्थसंकल्पात पत्रकारांसाठी मेट्रो प्रवास मोफत करावा.
• महापालिकेमार्फत उभारल्या जाणार निवासी बांधकाम प्रकल्पात १०% आरक्षण द्यावे.
• बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भूषण राज्यस्तरीय सोहळ्यासाठी १० लाखांचा निधी राखीव ठेवावा.
• नवीन प्रशासकीय इमारतीत पत्रकारांसाठी सुविधा युक्त स्वतंत्र कक्ष आणि हॉल असावा.

पिंपरी ,दि.१८ :- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई यांच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांना पत्रकारांच्या संबंधित विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, ज्येष्ठ पत्रकार संतोष मिश्रा, मिलिंद कांबळे, तुषार रंधवे, सह संपर्कप्रमुख पराग कुंकुलोळ, अमोल काकडे पत्रकार हल्ला कृती समितीचे कोकण विभागीय अध्यक्ष नवनाथ कापले, शहराध्यक्ष अतुल क्षीरसागर, सचिव जमीर सय्यद, पिंपरी विभागीय अध्यक्ष विकास शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महानगर क्षेत्रामध्ये कार्यरत पत्रकारांना त्यांच्या कामाच्या स्वरूपामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वारंवार प्रवास करावा लागतो. शहराच्या वाहतुकीची परिस्थिती लक्षात घेता, पत्रकारांना वेळेवर आणि सुलभ पद्धतीने गंतव्यस्थानी पोहोचता यावे यासाठी महापालिकेच्या वतीने मेट्रो प्रवास मोफत उपलब्ध करून द्यावा.

सध्या विविध राज्यांमध्ये पत्रकारांसाठी मोफत प्रवासाची सुविधा दिली जाते. पुणे-मुंबई आणि इतर शहरांमध्ये मेट्रो सेवा विस्तारली असून, पत्रकारांना त्यांच्या पत्रकारितेच्या जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडण्यासाठी मोफत प्रवास उपलब्ध करून दिल्यास त्याचा शहराच्या विकासात निश्चितच सकारात्मक परिणाम होईल.

पत्रकारांना त्यांच्या कर्तव्यातून समाजाच्या विविध घटकांसाठी अहोरात्र कार्य करावे लागते. मात्र, सुरक्षित व स्थिर निवासाची सुविधा मिळणे ही त्यांच्यासाठी एक मोठी समस्या आहे. सध्या विविध सरकारी प्रकल्पांत, विशेषतः गृहनिर्माण योजनांमध्ये विविध घटकांसाठी विशिष्ट टक्केवारीने आरक्षण दिले जाते. त्याच धर्तीवर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अधिपत्याखाली येणाऱ्या निवासी प्रकल्पांमध्ये पत्रकारांसाठी किमान १०% गृहनिर्माण आरक्षण ठेवण्यात यावे.

पत्रकारिता क्षेत्रातील अग्रणी, बाळशास्त्री जांभेकर यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. त्यांच्याच स्मरणार्थ पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या पत्रकारांना सन्मानित करण्यासाठी “बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भूषण” राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो.

पिंपरी-चिंचवड हे औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर असून, येथे कार्यरत पत्रकार आपल्या अहोरात्र सेवेमुळे समाजातील विविध मुद्द्यांना प्रकाशात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. या पार्श्वभूमीवर, पत्रकारांचा सन्मान राखण्यासाठी व पुरस्कार सोहळ्याला आवश्यक पाठबळ मिळावे म्हणून महापालिका अर्थसंकल्पात १० लाख रुपयांची कायमस्वरूपी तरतूद करण्यात यावी.

महानगरपालिकेच्या नवीन इमारती मध्ये पत्रकारांसाठी काम अधिक सुलभ होण्यासाठी काही सुधारणा आवश्यक आहेत. त्यामुळे नवीन प्रशासकीय इमारतीत स्वतंत्र पत्रकार कक्ष , संगणक कक्ष, स्वतंत्र कॉन्फरन्स हॉल, बैठकीसाठी आवश्यक सुविधा, प्रवेश व ओळखपत्र सुविधा असावी महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये यासाठी योग्य जागा उपलब्ध करून दिल्यास, स्थानिक पत्रकारांचे काम अधिक प्रभावीपणे पार पाडता येईल आणि प्रशासन व प्रसारमाध्यमांमधील संवाद अधिक सुस्पष्ट आणि सुलभ होईल.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!